मनोगत

भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. देशाच्या लोकसंख्येत निम्म्याहून अधिक लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. शेतीच्या लागवडीखालील जमिनीचा विचार करता, जगात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. परंतु शेतीमालाच्या निर्यातीत थोडे वेगळे चित्र समोर येते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताचा वाटा ४% हुन कमी असून भारताचा क्रमांक नववा लागतो. इंडोनेशिया, थायलंड या सारख्या लहान देशांचा क्रमांक देखील भारताच्या वर लागतो. पारंपारिकतेने एखाद्या मालाचे प्रमाणापेक्षा जास्त उत्पादन झाल्यास किंवा नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास शेतीमालाची निर्यात किंवा आयात केली जात असे. परंतु, हे चित्र झपाट्याने बदलताना दिसत आहे. प्रगत देश शेती मालाच्या आयात व निर्यात यावरील निर्बंध कमी करून मुक्त बाजारपेठेचा अंगीकार करत आहेत. आंतरराष्ट्रीय ग्राहक आता नवीन प्रकारचा किंवा उच्च प्रतीचा शेती माल वापरण्यास उत्सुक आहे. तसेच आरोग्यास पूरक अशा नवीन शेतीमालाचा उपयोग खाद्य पदार्थात वापरण्याचा प्रघात वाढत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून शेती मालाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झपाट्याने वाढ होत आहे.

भारतीय शेतीमालाचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सहभाग अनेक पटीने वाढण्याची शक्यता आहे. परंतु यासाठी सरकारी पातळीवर आणि निजी पातळीवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कार्य करणे आवश्यक आहे. देशातील प्रगत शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती मालाच्या उत्पादनात तसेच गुणवत्तेत सुधारणा करण्यात बऱ्याच अंशी यशस्वी झाला आहे. परंतु, कापणी पश्चात प्रणालीवर आजही देशातील शेतकऱ्याची पुरेशी पकड बसलेली दिसत नाही. शेती मालावर प्रक्रिया करणे, आधुनिक पॅकिंग व साठवणूक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे, सक्षम विक्री - पुरवठा साखळी तयार करणे इत्यादी विषयावर आजही बरेच काम करणे आवश्यक आहे. शेती माल किंवा शेती मालावर प्रक्रिया करून त्याची निर्यात करणे व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर तर आहेच आणि  तसेच सर्वसामान्यालाही सहज शक्य आहे. परंतु यासाठी निर्यात व्यवसायाची व्याप्ती किती आहे, निर्यात ऑर्डर कशा मिळवाव्या, निर्यात कार्यप्रणाली व प्रलेखन याची पूर्तता कशी करावी, आंतरराष्ट्रीय वाहतूक कशी केली जाते, निर्यातविषयक आर्थिक व्यवहार कसे केले जातात इत्यादी गोष्टींचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे.

मी गेली तीस वर्षे आयात - निर्यात व्यवसायात काम करत आहे. या तीस वर्षांमध्ये अनेक देशात प्रवास करण्याचा व स्थानिक लोकांची मानसिकता समजावून घेण्याचा योग आला. शेतीमालाचे पॅकिंग, साठवणूक, प्रलेखन, मालाची हाताळणी व वाहतूक, आर्थिक व्यवहार इत्यादी विषयांवर प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव आला. त्याचबरोबर स्वतः शेतकरी असल्याने शेतीमध्ये येणाऱ्या प्रत्यक्ष अडचणी समजून घेता आल्या. शेती मालाची निर्यात करावयाची असेल तर काय करावे लागेल याचा व त्यातील संभाव्य अडचणींचा बारकाईने अभ्यास करण्याचा योग आला. या सर्व अनुभवाचा फायदा मराठी तरुणांना व्हावा या साठी प्रशिक्षणपर लेखन करावे ही इच्छा निर्माण झाली आणि त्यातूनच ह्या पुस्तकाची निर्मिती झाली. .

जास्तीतजास्त मराठी तरुणांना निर्यात व्यवसाय सुरु करता यावा हा या पुस्तकाचा मूळ हेतू आहे. या पुस्तकाद्वारे आपला स्वतःचा शेती माल अथवा स्थानिक बाजारातून माल घेऊन उद्योजकाला त्याची निर्यात करणे सुलभ व्हावे ही अपेक्षा आहे. त्याचबरोबर निर्यात कंपनीत काम करणाऱ्या तरुणांना देखील या पुस्तकाचा फायदा होईल ही अपेक्षा आहे. निर्यात उद्योजक, सल्लागार, शिक्षक इत्यादींना देखील या पुस्तकातील माहिती उपयोगी पडेल अशी खात्री वाटते.

पुस्तक लिहिण्यात व प्रकाशित करण्यात माझे कुटुंबीय, सहकारी, मित्र, प्रकाशक, यांनी दिलेल्या प्रोत्साहन आणि मदतीशिवाय या पुस्तकाचे प्रकाशन शक्य नव्हते. या सर्वांचा मी शतशः ऋणी आहे.

-   गिरीश घाटे