१. परिचय
भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतातील ५८% लोकसंख्या कृषी व्यवसायावर अवलंबून आहे. २०२० साली देशाचा शेती व शेती संलग्न व्यवसाय १९.४८ लाख कोटी रुपये इतका नमूद करण्यात आला असून हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा १७% भाग होतो. शेती व्यवसाय पुढील काही वर्षात १०% हुन अधिक वेगाने वाढण्याचा अंदाज सरकारने प्रसिद्ध केला आहे.
देशातील ३९६ दशलक्ष एकर जमीन शेतीखाली असून, याबाबतीत जगात भारत दुसऱ्या क्रमाकांचा देश आहे. . परंतु, भारताची कृषीमालाची निर्यात ३९ अब्ज अमेरिकी डॉलर इतकी असून ही जागतिक निर्यात बाजारपेठेच्या केवळ ३.४% आहे. भारतीय शेतीमालाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अनेक पटीने वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु, यासाठी सरकारी पातळीवर आणि निजी पातळीवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कार्य करणे आवश्यक आहे. शेती माल किंवा शेती मालावर प्रक्रिया करून त्याचा निर्यात करणे व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर तर आहेच, तसेच सर्वसामान्यानाही सहज शक्य आहे. परंतु यासाठी निर्यात व्यवसायाची व्याप्ती किती आहे, निर्यात ऑर्डर कशा मिळवाव्या, निर्यात कार्यप्रणाली व प्रलेखन याची पूर्तता कशी करावी, आंतरराष्ट्रीय वाहतूक कशी केली जाते इत्यादींचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. शेती माल कसा निर्यात करावा व निर्यातीची कार्य प्रणाली काय यावरील अनेक व्यावहारिक विषयांवर कोर्स शृंखला तयार करण्यात आली आहे. कोर्स शृंखला पुढील सहा भागात विभागली आहे:
( १ ) परिचय
( २ ) आंतरराष्ट्रीय बाजारपेठ व संधी
( ३ ) निर्यात विपणन / एक्स्पोर्ट मार्केटिंग
( ४ ) निर्यात - कार्यप्रणाली व प्रलेखन
( ५ ) निर्यात - हाताळणी व वाहतूक
( ६ ) निर्यात - आर्थिक व्यवहार
या विभागांमध्ये आपल्याला काय शिकायला मिळेल हे आता आपण पाहू:
आंतरराष्ट्रीय बाजारपेठ व संधी
शेती आणि शेतीसंलग्न व्यवसायात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची व्याप्ती किती आहे, व भारतीय निर्यातदाराला त्यात निर्यातीची किती संधी आहे, याबद्दल सविस्तर विवेचन या भागात केले आहे. शेती व शेतीसंलग्न व्यवसायातील काही प्रमुख पिकांचे व पदार्थांचे भारतात किती उत्पादन आहे, त्याची निर्यात किती आहे, भारतीय शेती माल आयात करणारे कोणते प्रमुख देश आहेत आणि भारताची कोणती राज्ये त्या पिकांच्या उत्पादनात अग्रेसर आहेत याबद्दल माहिती आपल्याला या भागात मिळेल. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची व्याप्ती व संधी पुढील चार भागात विभागली आहे: (१) ताजी फळे व भाजीपाला, (२) प्रक्रियाकृत खाद्य, (३) पशु उत्पादन, आणि (४) तृणधान्य.
निर्यात विपणन / एक्स्पोर्ट मार्केटिंग
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्या शेती मालाचे मार्केटिंग कसे करावे, याबाबत सविस्तर वर्णन या भागात केले आहे. ‘एक्स्पोर्ट मार्केटिंगची’ स्थापना आणि व्यवस्थापन कसे करावे, संभाव्य ग्राहकांपर्यंत कसे पोहोचावे, आपल्या मालाची विश्वासार्ह्यता ग्राहकाला कशी पटवून द्यावी, विक्रीची वितरण व्यवस्था कशी असावी इत्यादी बाबतची माहिती या भागात मिळेल. ‘एक्स्पोर्ट मार्केटिंग’ संकल्पना पुढील चार भागात मांडली आहे: (१) व्यवसायाची ब्रँड निर्मिती, (२) डिजिटल मार्केटिंग, (३) वितरण प्रणाली, आणि (४) मार्केटची प्राथमिक उभारणी.
निर्यात - कार्य प्रणाली व प्रलेखन
प्रलेखन म्हणजे डॉक्युमेंटेशन. निर्यात व्यवसाय सुरु करताना, तसेच निर्यात करताना व निर्यात केल्यानंतर लागणाऱ्या दस्तऐवजांची सविस्तर माहिती या भागात दिली आहे. निर्यात व्यवसायात कोणते महत्वाचे दस्तऐवज आहेत, हे दस्तऐवज कसे तयार करावेत व त्यांची कार्यप्रणाली काय आहे, तसेच या दस्तऐवजांचे अनुपालन कसे महत्वाचे आहे, याचा अभ्यास या भागात केला आहे. ‘निर्यात - कार्य प्रणाली व प्रलेखन’ हा विषय पुढील चार भागात मांडला आहे: (१) व्यवसायाची स्थापना, (२) निर्यातीपूर्व अनुपालन, (३) ‘प्रत्यक्ष निर्यात’ प्रणाली आणि (४) ‘निर्यात पश्चात’ प्रणाली
निर्यात - हाताळणी व वाहतूक
निर्यात माल ग्राहकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचवताना काय काळजी घ्यावी , व मालाची वाहतूक कशी करावी याबद्दलची माहिती या भागात दिली आहे. निर्यात मालाचे पॅकिंग कसे करावे, साठवणूक कशी करावी, आंतरराष्ट्रीय वाहतुकीचे कोणते प्रकार आहेत व आपल्याला योग्य असा वाहतूक प्रकार कसा निवडावा, वाहतुकीची कार्यप्रणाली काय आहे, आंतरराष्ट्रीय वाहतूकीतील प्रचलित संज्ञा काय आहेत, याचे सविस्तर विवेचन या भागात केले आहे. ‘निर्यात - हाताळणी व वाहतूक’ हा विषय पुढील पाच भागात मांडला आहे: (१) पॅकिंग व साठवणूक, (२) आंतरराष्ट्रीय वाहतूक, (३) हवाई मार्ग, (४) समुद्री मार्ग, (५) इन्कोटर्म
निर्यात - आर्थिक व्यवहार
मालाची निर्यात केल्यानंतर ग्राहकाकडून मोबदला मिळवण्याचे प्रकार व इतर संबंधित आर्थिक व्यवहारांची माहिती या भागात दिली आहे. ग्राहकांकडून मोबदला मिळवण्याचे कोणते प्रकार आहेत व त्यापैकी कोणता प्रकार निवडावा, ‘परकीय चलना’ बाबत रिजर्व बँकेचे नियम काय आहेत व त्यांचे काय महत्त्व आहे, निर्यात झाल्यानंतर GST चा परतावा कसा मिळवावा, परकीय चलनातील धोके काय आहेत व त्यावर काय उपाय आहेत याची माहिती या भागात मिळेल. ‘निर्यात - आर्थिक व्यवहार’, या विषयाची मांडणी पुढील पाच भागात केली आहे: (१) निर्यात वसुली, (२) लेटर ऑफ क्रेडिट, (३) रिजर्व वँकेचे निर्यात विषयक नियम, (४) GST परतावा, (५) चलन विनिमय व अनिश्चितता
हा कोर्स कोणी करावा
शेती व शेतीसंलग्न मालाची निर्यात या विषयात नोकरी-व्यवसाय करणाऱ्या व करू इच्छित असणाऱ्या मराठी तरुण वर्गाला समोर ठेऊन हा कोर्स तयार केला आहे. आपला शेतीमाल निर्यात करणे किंवा स्थानिक बाजारातून माल खरेदी करून निर्यात करणे यात स्वतःचा व्यवसाय सुरु करणाऱ्यांना हा कोर्स अतिशय उपयुक्त ठरेल. तसेच निर्यात कंपनीत काम करणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्या तरुणांना देखील हा कोर्स अतिशय उपयुक्त ठरेल. तसेच, निर्यात उद्योजक व वरिष्ठ व्यवस्थापक, शेती व्यवस्थापन शिक्षक, इत्यादीना देखील व्यवहाराची परिपूर्णता समजावून घेण्यास हा कोर्स उपयुक्त ठरेल.
पात्रता
हा कोर्स करण्यासाठी कोणतीही शैक्षणिक पात्रता आवश्यक नाही. परंतु, विषयाचा आवाका पाहता कमीतकमी उच्च माध्यमिक शालेय शिक्षण झालेले असल्यास योग्य ठरेल. अथवा या विषयातील दहा ते बारा वर्ष व्यावहारिक अनुभव असल्यासदेखील हा कोर्स करणे सहज होईल.
कालावधी
हा कोर्स मुक्त शिक्षण पद्धतीने तयार केलेला असल्यामुळे याला वेळेचे बंधन नाही. आपल्या सवडीनुसार व गरजेनुसार हा कोर्स पूर्ण करता येईल. आपला चालू व्यवसाय अथवा नोकरी सांभाळून हा कोर्स करणे अपेक्षित आहे. रोज एक तास या कोर्स साठी दिल्यास हा कोर्स ४५ दिवसात पूर्ण करता येईल.