शेतीमालाच्या निर्यात-बाजारपेठेची व्याप्ती व संधी
२.१ परिचय
शेती माल कसा निर्यात करावा व निर्यातीची कार्य प्रणाली काय यावरील अनेक विषयांवर कोर्स शृंखला तयार करण्यात आली आहे. त्यापैकी शेतीमालाच्या निर्यात-बाजारपेठेची व्याप्ती व संधी यावर हा कोर्स तयार केला आहे. कार्य प्रणालीचे विवेचन पुढील विभागात केले आहे:
( १ ) परिचय
( २ ) आंतरराष्ट्रीय बाजारपेठ
( ३ ) ताजी फळे व भाजीपाला - व्याप्ती व संधी
( ४ ) प्रक्रियाकृत खाद्य - व्याप्ती व संधी
( ५ ) पशु उत्पादन - व्याप्ती व संधी
( ६ ) तृणधान्य - व्याप्ती व संधी
२.२. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ
शेती मालाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ २०२० मध्ये ९६०२ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी असून पुढील काही वर्षात ती ६% ने वाढण्याचा अंदाज आहे. वल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (WTO) च्या २०२० च्या आकडेवारीप्रमाणे भारताची शेती माल निर्यात ३९ दशलक्ष अमेरिकन डॉलर असून, त्याबाबतीत भारताचा जगात ९ वा क्रमांक लागतो. जगातील प्रथम दहा देशांची यादी खालील प्रमाणे आहे:
देश
दशलक्ष अमेरिकन डॉलर (दशलक्षा मध्ये)
युरोपिअन युनिअन, ६५३
अमेरिका, १७०
ब्राझील, ९३
चीन, ७८
कॅनडा, ७०
इंडोनेशिया, ४६
थायलंड, ४१
मेक्सिको, ४१
भारत, ३९
अर्जिन्टिना, ३७
सन २००० नंतर शेती मालाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आमूलाग्र बदल झाले आहेत. सन २००० आधी शेती माल निर्यातीत २% वाढ होत असे. परंतु २००० नंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ८% हुन अधिक वेगाने वाढताना दिसून येत आहे. देशांतर्गत शेती माल बाजारपेठ व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ यातील तफावत कमी होताना दिसत आहे.
देशात एखाद्या प्रकारच्या मालाचे अतिशय जास्त उत्पादन झाल्यास त्याची विल्हेवाट लावण्यासाठी शेतीमाल निर्यात हा एक पर्याय समाजाला जात असे. अथवा एखाद्या वर्षी एखादे पीक आले नाही किंवा खूप कमी प्रमाणात आले तर स्थानिक बाजारपेठेत माल आयात केला जात असे. स्थानिक शेतीमालाला प्राधान्य देऊन आयती मालास प्रतिबंध ठेवण्याचा सर्वसामान्य प्रघात होता. परंतु हे चित्र झपाट्याने बदलताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. बाजारपेठेच्या वाढीची प्रमुख करणे खालील प्रमाणे आहेत:
● अनेक देश शेती मालाच्या आयात निर्यातीवरील निर्बंध कमी करून मुक्त बाजारपेठेचा अंगीकार करत आहेत. यामुळे आयात व निर्यात सोपी झाली आहे.
● नवीन प्रकारचा अथवा प्रतीचा माल वापरण्याची मागणी ग्राहकांकडून होत आहे. ग्राहकांकडून विविध प्रकारच्या मालाची मागणी वाढताना दिसत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातून माल खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येतो.
● शेती मालाच्या गुणवत्तेकडे ग्राहकाचे विशेष लक्ष वाढीस लागले आहे. जास्त गुणवत्तेचा शेतीमाल वाढीव किंमतीत विकत घेण्याची तयारी ग्राहकांमध्ये दिसून येते.
● ग्राहकांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता वाढत आहे. आरोग्यास पूरक अशा नवीन शेतीमालाचा उपयोग खाद्य पदार्थात वापरण्याचा प्रघात वाढत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठ व भारत
भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारतात शेतीचा आणि पिकांचा इतिहास मोठा आहे. भारताच्या विस्तीर्ण आणि सुपीक जमीनीमुळे व भौगोलिक विविधतेमुळे भारतात अनेक प्रकारची आणि प्रजातींची पिकांचे आणि फळांचे उत्पादन होते. भारतातील हरित क्रांती, धवल क्रांती यांसारख्या शेतीशी निगडीत उपक्रमांमुळे नव्या प्रजातींची फळे आणि पिके मुबलक प्रमाणात उपलब्ध झाली आहेत. शेती व्यवसाय देशाच्या GDP च्या १७% इतका नमूद करण्यात आला आहे. देशाची ३९६ अब्ज? एकर जमीन शेतीखाली असून यात जगात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. परंतु त्यामानाने भारताचा क्रमांक अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बराच खाली असलेला दिसून येतो. गेल्या काही वर्षात मात्र भारताने शेती माल निर्यातीत बरीच प्रगती केली आहे. वर नमूद केल्याप्रमाणे भारताचा शेतीमाल निर्यातीत आता जगात ९ वा क्रमांक लागतो.
अपेडा संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या शेतीमाल निर्यातीची गेल्या तीन वर्षाची आकडेवारी खाली नमूद केली आहे. अपेडा अंतर्गत येणाऱ्या शेती मालाची २०२०-२१ साली २०.६७ अब्ज अमेरिकन डॉलर्सएवढी निर्यात नमूद झाली आहे. त्याची ‘दशलक्ष अमेरिकन डॉलर्स USD’ मध्ये वर्गवारी विभागणी खालील प्रमाणे आहे:
TABLE
फुलशेती : फुलशेतीत मुख्यत्वेकरून गुलाब, एन्थुरिअम, जर्बेरा, कार्नेशन, शेवंती यांसारखी फुले, कुंडीतील फुलझाडे, ग्रीनहाऊस मधील फुलशेती, इत्यादींचा समावेश होतो. भारताच्या शेतीमाल निर्यातीत फुलशेतीचा वाटा लहान आहे. शेतीमालाच्या केवळ ०.९% निर्यात ही फुलशेतीची आहे. परंतु भारत सरकारने फुलशेती उदयोन्मुख उत्पादन घोषित केले आहे व त्याच्या निर्यातीस प्राधान्य दिले आहे. फुलशेती निर्यात प्रामुख्याने अमेरिका, नेदरलँड, UAE, UK आणि जर्मनी या देशांना केली जाते. फुलशेतीची निर्यात प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, हरयाणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, राजस्थान या राज्यांतून होते.
ताजे फळ व भाजीपाला : भारताच्या ताज्या फळांच्या निर्यातीत प्रामुख्याने द्राक्ष, केळी, पपई, डाळिंब, आंबे, पेरू, इत्यादींचा समावेश होतो. तर ताज्या भाज्यांमध्ये आले, बटाटा, कांदा, वांगी, कोबी, इत्यादी भाज्यांचा समावेश होतो. शेती मालाच्या निर्यातीत ताजी फळे व भाजीपाल्याचा ६.५% हिस्सा आहे. ताजी फळे व भाजीपाला यांची निर्यात प्रामुख्याने बंगला देश, UAE, नेदरलँड, नेपाळ, मलेशिया, UK, श्रीलंका, ओमान, कतार इत्यादी देशांना होते. ताजी फळे व भाजीपाला यांची निर्यात प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, तेलंगणा, गुजरात, बिहार, पंजाब इत्यादी राज्यांतून होते .
प्रक्रियाकृत फळ व भाजीपाला : प्रक्रियाकृत फळे व भाजीपाला निर्यातीत प्रामुख्याने वाळवलेल्या व आंबवलेल्या भाज्यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ वाळवलेले आले, कांदा, मश्रुम, लसूण, बटाटे इत्यादी. मिठाच्या अथवा साखरेच्या पाण्यातील किंवा व्हिनीगर यामध्ये टिकलेल्या भाज्या, फळांचे पल्प व ज्युसेस, वेगवेगळ्या डाळी इत्यादी. शेतीमालाच्या निर्यातीत प्रक्रियाकृत फळे व भाज्या यांचा हिस्सा ७.४% इतका आहे. यांची निर्यात प्रामुख्याने अमेरिका, रशिया, युरोप, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, UAE, चीन इत्यादी देशांना होते. प्रक्रियाकृत फळ व भाजीपाला यांची निर्यात प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यांतून होते.
प्रक्रियाकृत खाद्य : प्रक्रियाकृत खाद्य पदार्थात मुख्यत्वेकरून मिठाई, चॉकलेट, कोको पदार्थ, तृणधान्य व कडधान्यापासून बनवलेले पदार्थ, अल्कोहोल पासून बनवलेले पदार्थ, डबे बंद पदार्थ, ‘रेडी टू ईट’, ‘रेडी टू कुक’ पदार्थ इत्यादिंचा समावेश होतो. या प्रकारच्या पदार्थांना आंतरराष्ट्रीय बाजारात वाढती मागणी आहे व या पदार्थांची निर्यात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. भारताच्या निर्यातीच्या १६.७% हिस्सा प्रक्रियाकृत खाद्य या विभागात मोडतो. प्रक्रियाकृत खाद्यपदार्थ, युरोप, आखाती देश, जपान, सिंगापूर व इतर दक्षिण-पूर्व आशियायी देश येथे प्रामुख्याने निर्यात केले जातात. प्रक्रियाकृत खाद्यपदार्थांची निर्यात मुख्यत्वेकरून महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा, केरळ, पंजाब, तेलंगण इत्यादी राज्यांतून होते.
पशु उत्पादन : पशु उत्पादनात मांस व प्रक्रियाकृत मांस, चामडे, पोल्ट्री, दूध व दुग्धजन्य पदार्थ, मध इत्यादी पदार्थांचा समावेश होतो. पशु उत्पादन निर्यातीत भारत अग्रेसर असून भारताच्या निर्यातीचा १७.८% हिस्सा पशु उत्पादनातून येतो. पशु उत्पादनाची निर्यात प्रामुख्याने मलेशिया, व्हिएतनाम, इजिप्त, इराक, सौदी अरेबिया, ओमान, दक्षिण-पूर्व आशिया इत्यादी देशांना होते. पशु उत्पादन प्रामुख्याने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरयाणा, तामिळनाडू इत्यादी राज्यांतून होते
तृणधान्य : भारताच्या तृणधान्य निर्यातीत प्रामुख्याने बासमती व इतर तांदूळ, गहू, बाजरी, मका, इत्यादी पदार्थांचा समावेश होतो. भारताच्या निर्यातीच्या ४८.७% हिस्सा तृणधान्य निर्यातीतून होतो. तृणधान्य निर्यात प्रामुख्याने आखाती देश, अमेरिका, UK, बांगलादेश, इत्यादी देशांना होते तृणधान्य निर्यात प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांमधून होते
आंतरराष्ट्रीय बाजारपेठ व महाराष्ट्र
भारताच्या निर्यातीत महाराष्ट्राचा वाट मोठा आहे. अपेडा पदार्थांच्या निर्यातीती पहिल्या क्रमांकावर गुजरात राज्य असून महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो. भारताच्या निर्यातीची अपेडा २०२०-२१ ची राज्यवार आकडेवारी खालील प्रमाणे आहे:
TABLE
वेगवेगळ्या शेती माल प्रकारात देशाच्या निर्यातीत महाराष्ट्राचा क्रमांक व निर्यातीतील हिस्सा खालील प्रमाणे आहे:
TABLE
अनेक शेतीमालाच्या निर्यातीत महाराष्ट्राचा क्रमांक पहिला लागतो व देशाच्या निर्यातीत राज्याचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्रातून निर्यात होणारे प्रमुख शेतीमाल व खाद्यपदार्थ पुढील प्रमाणे आहेत:
TABLE
२.३. ताजी फळे व भाजीपाला - व्याप्ती व संधी
भारतातील वैविध्यपूर्ण हवामानामुळे देशात अनेक प्रकारची ताजी ‘फळे आणि भाजीपाल्याचे’ उत्पादन होते. ‘फळे आणि भाजीपाला’ उत्पादनात भारत हा चीननंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाने प्रकाशित केलेल्या डेटाबेस नुसार, २०१९-२० मध्ये, भारताने ९९.०७ दशलक्ष ‘मेट्रिक टन’ फळे आणि १९१.७७ दशलक्ष ‘मेट्रिक टन’ भाजीपाल्याचे उत्पादन केले. फळांच्या लागवडीखालील क्षेत्र ६.६६ ‘दशलक्ष हेक्टर’ आहे, तर भाजीपाला लागवडीखालील क्षेत्र १०.३५ दशलक्ष हेक्टर’ आहे. FAO (२०१९) नुसार, भारत हा जगातील भाजीपाला उत्पादनात ‘आले’ आणि भेंडीचा सर्वात मोठा उत्पादक आहे आणि बटाटे, कांदा, फ्लॉवर, वांगी, कोबी इत्यादींच्या उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. फळांमध्ये, केळी, पपई आणि आंबा यांच्या उत्पादनात देश पहिल्या क्रमांकावर आहे.
देशातील फळांच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळे भारताला ताज्या फळांच्या निर्यातीस प्रचंड संधी आहे. २०२०-२१ मध्ये भारताने ६७४.५३ ‘मिलियन USD’ फळे आणि ६६७.६१ ‘मिलियन USD’ भाजीपाला यांची निर्यात केली. देशातून निर्यात होणाऱ्या फळांमध्ये द्राक्षे, डाळिंब, आंबा, केळी, संत्री यांचा मोठा वाटा आहे, तर कांदे, बटाटे, टोमॅटो आणि हिरवी मिरची हे निर्यातीत मोठ्या प्रमाणात योगदान देतात. भारतीय फळे आणि भाजीपाल्याच्या निर्यातीची प्रमुख ठिकाणे बांगलादेश, UAE, नेदरलँड, नेपाळ, मलेशिया, UK, श्रीलंका, ओमान आणि कतार इत्यादी आहेत.
जागतिक बाजारपेठेतील भारताचा वाटा अजूनही जवळपास 1% असला तरी, देशातल्या फळांची स्वीकृती वाढत आहे. अत्याधुनिक कोल्ड-चेन (शीत पदार्थ वाहतूक आणि हाताळणी), ‘पायाभूत सुविधा’ आणि ‘गुणवत्ता हमी’ यामुळे हे घडले आहे. खाजगी व सार्वजनिक क्षेत्राने पुढाकार घेऊन अपेडाच्या सहाय्याने देशात ‘कापणी पश्चात हाताळणी’ सुविधा व ‘कोल्ड स्टोरेज’ स्थापन केले आहेत. शेतकरी, प्रोसेसर आणि निर्यातदार यांची निर्यात क्षमतेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
महाराष्ट्राच्या दृष्टीने काही महत्वाच्या ‘फळे व भाजीपाला’ यांच्या निर्यातीची सविस्तर माहिती आपण समजावून घेऊ.
द्राक्ष
द्राक्षाचे उत्पादन समशीतोष्ण ते उष्ण व कोरड्या प्रदेशात घेतले जाते. भारतीय द्राक्षे रंगीत, पांढरी, बियाणे नसलेली, ‘मोठी आणि लहान’ अशा विविध वैशिष्ट्यांसह येतात. भारतीय द्राक्षे समुद्र-सपाटीपासून सरासरी २५० मीटर आणि त्याहून अधिक उंचीवर यशस्वीरित्या पिकवली जातात. भारतात द्राक्षाच्या २० पेक्षा जास्त जाती लागवडीखाली आहेत. तथापि, व्यावसायिकदृष्ट्या केवळ दहा ते बारा प्रकारच्या प्रचलित जाती आहेत. रंग आणि बियांच्या आधारे खालील ४ श्रेणींमध्ये त्यांचे गट केले जाऊ शकतात.
TABLE
‘थॉम्प्सन सीडलेस’ व ‘क्लोन’ या जाती सर्वाधिक प्रचलित आहेत. द्राक्षाच्या उत्पादनात ५५% क्षेत्र हे थम्प्सन व क्लोन या जातीच्या लागवडीखाली आहे. त्याखालोखाल ‘बंगलोर ब्लु’ जातीचा क्रमांक लागतो. द्राक्षाच्या उत्पादनातील १५% क्षेत्र ‘बंगलोर ब्लु’ या जातीच्या लागवडीखाली आहे. त्याखालोखाल अनाबेशाही व दिलखुष ( १५% ), ‘शरद सीडलेस’ ( ५% ) आणि गुलाबी व भोकरी ( ५% ) या जातींचा समावेश होतो.
द्राक्षाची लागवड महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यात केली जाते. परंतु, देशाच्या द्राक्षाच्या उत्पादनातील ८८% उत्पादन हे महाराष्ट्रात घेतले जाते. महाराष्ट्रात नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे, सातारा, अहमदनगर या तालुक्यात प्रामुख्याने द्राक्षाचे उत्पादन येते. देशाने २०२०-२१ या वर्षात ३१३.५७ ‘दशलक्ष अमेरिकन डॉलर्स ’ किमतीची 2,46,107 ‘मेट्रिक टन’ द्राक्षे निर्यात केली आहेत. भारतीय द्राक्षाच्या खरेदीत नेदरलँड ( ३६% हिस्सा ) अग्रेसर आहे. त्याखालोखाल UK ( ११% ), बांगलादेश ( १०% ), रशिया ( १०% ), आखाती देश, युरोप इत्यादी देशांना भारतातून द्राक्षाची निर्यात होते.
आंबे
भारतीय आंबे विविध आकार, रंग, चव आणि सुगंध यात आढळून येतात. भारतीय आंबा संपूर्ण जगात एक दर्जेदार आणि पोषक फळ म्हणून प्रसिद्ध आहे. शरीराला एका दिवसाला लागणारे फायबर एका आंब्यातून येते. हृदयरोग, कर्करोग व कोलेस्ट्रॉल यावर आंबा एक गुणकारी फळ म्हणून ओळखला जातो. याशिवाय आंब्यात पोटॅशिअम व अँटीऑक्सिडंट याची मात्रा मोठ्या प्रमाणावर आढळते. भारतात, आंबे प्रामुख्याने उष्ण-कटिबंधीय आणि उपोष्ण-कटिबंधीय प्रदेशात समुद्रसपाटीपासून 1,500 मीटर उंचीपर्यंत घेतले जातात. 27˚C च्या आसपास तापमान असेल तर आंबा चांगला वाढतो. आंब्याच्या १,००० हुन अधिक जाती भारतात उपलब्ध आहेत. बहुतकरून जातींना विशिष्ठ प्रकारचे हवामान आवश्यक असते. दक्षिण व पश्चिम भारतातील आंब्यांचा मोसम आधी, तर उत्तर-पूर्व भागातील आंब्यांचा मोसम उशिरा येतो. दक्षिण भागातील काही आंब्याच्या जाती वर्षभर फळ देतात. आंब्याच्या प्रचलित जाती पुढील प्रमाणे आहेत:-
आंध्र प्रदेश - बांगनापल्ली, सुवर्णरेखा, नीलम आणि तोतापुरी
बिहार - ‘बॉम्बे ग्रीन’, चौसा, दशहरी, फाजली, गुलाब-खास, ‘किशन भोग’, हिमसागर
गुजरात - केसर, अल्फोन्सो, राजापुरी, जमादार, तोतापुरी, आणि लंगडा
हरियाणा - चाऊसा, दशहेरी, लंगडा आणि फाजली
हिमाचल प्रदेश - चौसा , दशहरी आणि लंगडा
कर्नाटक - हापूस, तोतापुरी, बंगन-पल्ली, पायरी, नीलम आणि मागोवा
मध्य प्रदेश - हापूस, ‘मुंबई ग्रीन’, दशहरी, फाजली, लंगडा आणि नीलम
महाराष्ट्र - हापूस, केसर आणि पायरी
पंजाब - चौसा, दशहेरी आणि मालदा
राजस्थान - ‘मुंबई ग्रीन’, चाऊस, दशेरी आणि लंगडा
तामिळनाडू - हापूस, तोतापुरी, बंगन-पल्ली आणि नीलम
उत्तर प्रदेश - ‘मुंबई ग्रीन’, चाऊस, दशहरी आणि लंगडा
पश्चिम बंगाल - फाजली, गुलाब-खास, हिमसागर, किशनभोग, लंगडा, आणि मुंबई-ग्रीन
आंब्याची निर्यात महाराष्ट्र, गुजरात, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश इत्यादी राज्यातून होते. परंतु आंब्याच्या निर्यातीच्या ८८% आंबे महाराष्ट्रातून निर्यात होतात. ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून प्रामुख्याने आंब्याची निर्यात होते. मराठवाड्यातील जिल्ह्यातून देखील आंब्यांचे उत्पादन होते.
भारतीय आंब्यांच्या निर्यातीपैकी ५५% निर्यात UAE देशाला व १८% निर्यात UK ला केली जाते. भारतीय आंबे आयात करणाऱ्या इतर देशांमध्ये आखाती देश, युरोप, दक्षिण-पूर्व आशिया यांचा समावेश होतो.
कांदा
भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कांदा उत्पादक देश आहे. भारतीय कांदे त्यांच्या तिखटपणासाठी प्रसिद्ध आहेत आणि वर्षभर उपलब्ध असतात. भारतीय कांद्याची दोन पीक-चक्रे आहेत, पहिली काढणी ‘नोव्हेंबर ते जानेवारी’ मध्ये सुरू होते आणि दुसरी काढणी ‘जानेवारी ते मे’ दरम्यान होते. भारतात आढळणाऱ्या कांद्याच्या प्रमुख जाती म्हणजे अग्रिफॉन्ड-रेड, NHRDF-रेड, अग्रिफॉन्ड-व्हाईट, अग्रिफॉन्ड-रेड, ‘पुसा-रत्नार’, पुसा-रेड, पुसा-व्हाईट.
कांद्याची निर्यात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, उत्तर प्रदेश इत्यादी राज्यातून होते. परंतु, भारताच्या कांदा निर्यातीच्या ५३% कांदा महाराष्ट्रातून निर्यात होतो. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर इत्यादी जिल्ह्यातून कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणावर येते.
भारतीय कांदा खरेदी करणाऱ्या देशांपैकी प्रमुख देश पुढीलप्रमाणे आहेत: बांगलादेश (२६% हिस्सा), मलेशिया (१६% हिस्सा), UAE (११% हिस्सा ), श्रीलंका (११% हिस्सा) इत्यादी.
इतर ‘फळे व भाजीपाला’
भाजीपाला जीवनसत्त्वांचा उत्कृष्ट स्रोत आहे. भाजीपाल्यामध्ये विशेषत: नियासिन, रिबोफ्लेविन, थायामिन आणि जीवनसत्त्वे ए आणि सी यांचा समावेश असतो. भाजीपाला प्रथिनांच्या व्यतिरिक्त कॅल्शियम आणि लोहासारखी खनिजे देखील पुरवतात. बहुतेक भाजीपाला, कमी कालावधीची पिके असल्याने, किफायती आणि उत्पादकांना खूप जास्त उत्पादन आणि आर्थिक परतावा देतात. भारतात पिकवल्या जाणार्या प्रमुख भाज्या म्हणजे बटाटा, कांदा, टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, बीन्स, काकडी आणि गार्किन, वाटाणे, लसूण आणि भेंडी. भारतात मिळणाऱ्या भाज्यांमध्ये आढळणाऱ्या जाती खालील प्रमाणे आहेत:
बटाटा : ‘कुफरी सिंधुरी’, ‘कुफरी चंद्रमुखी’, ‘कुफरी बादशाह’, ‘कुफरी बहार’
टोमॅटो : वैशाली, रुपाली, रश्मी, रजनी, ‘पुसा रुबी’
फुलकोबी : ‘पुसा दीपाली’, ‘अर्ली कुंवरी’, पंजाब
कोबी : ‘गोल्डन एकर’, पुसा मुक्ता, ‘पुसा ड्रमहेड’, के-1
मटार : आसौजी, ‘लखनौ बोनिया’, अलास्का, बोनविले, टी-19
भेंडी : पुसा मखमली, ‘पंजाब पद्मिनी’
ताज्या भाज्यांचे उत्पादन करणारी प्रमुख क्षेत्रे म्हणजे पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, ओरिसा, तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा, छत्तीसगड आणि झारखंड होत. भारत हा ताज्या भाज्यांचा जगातील प्रमुख निर्यातदार देश आहे. देशाने २०२०-२१ साली कांदा व्यतिरिक्त ६८२,०८५ ‘मेट्रिक टन’ किंवा २८९ ‘दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतका ताज्या भाजीपाला जगभरात निर्यात केला आहे. प्रमुख आयात करणारे देश म्हणजे UAE , नेपाळ, बांगलादेश, UK, कतार हे आहेत.
२.४ प्रक्रियाकृत खाद्य - व्याप्ती व संधी
‘प्रक्रियाकृत खाद्याचे’ उत्पादन, वापर आणि निर्यात यमध्ये वाढ होणे ही शेती उद्योगाची सर्वात महत्वाची आवश्यकता आहे. ‘प्रक्रियाकृत खाद्यात’ पुढील गोष्टींचा समावेश होतो: फळे आणि भाजीपाला, मसाले, मांस आणि पोल्ट्री, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, अल्कोहोलयुक्त पेये, मत्स्यपालन, धान्य प्रक्रिया, मिठाई, ‘चॉकलेट आणि कोको उत्पादने’, सोया-आधारित उत्पादने, खनिज पाणी, ‘उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ’ इत्यादी. भारताची प्रक्रियाकृत खाद्याची निर्यात २०२०-२१ मध्ये ४,९८७ ‘दशलक्ष अमेरिकन डॉलर्स ’ होती. याची तपशीलवार वर्गवारी खालील प्रमाणे आहे:
● आंब्याचा पल्प, 96.43 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स
● प्रक्रिया केलेल्या भाज्या, 223.05 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स
● प्रक्रिया केलेले फळे, रस आणि पल्प, 428.39 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स
● कडधान्ये, 2874 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स
● ग्वारगम 262.99 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स
● गूळ आणि मिठाई 358.88 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स
● कोको उत्पादने 635.75 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स
● अल्कोहोलयुक्त पेये 322.12 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स
● इतर प्रक्रियाकृत खाद्य 793.08 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आणि
● कडधान्याची उत्पादने 400 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स
भारतीय अन्नप्रक्रिया उद्योग हा प्रामुख्याने निर्यातप्रधान आहे. भारताच्या भौगोलिक परिस्थितीमुळे त्याला युरोप, मध्य पूर्व, जपान, सिंगापूर, थायलंड, मलेशिया आणि कोरिया या देशांशी कनेक्टिव्हिटीचा चांगला फायदा मिळतो.
निर्यात करण्यास योग्य अशा काही प्रक्रियाकृत खाद्य पदार्थांची माहिती पुढील भागात समजावून घेऊ:
प्रक्रियाकृत भाजीपाला
भाजीपाला वाळवून अथवा आंबवून त्याचे शेल्फ लाईफ वाढवले जाते. उदाहरणार्थ ‘कांद्याची पावडर’, ‘वाळवलेले मश्रुम’, ‘निर्जलीत लसूण पावडर’, ‘लसूण फ्लेक्स’, ‘सुकवलेले बटाटे’. तसेच ब्राईन मधील काकडी, हिरवी मिरची, इत्यादी उदाहरणे, ‘प्रक्रियाकृत भाजीपाला’ या प्रकारात मोडतात. भारत अशा ‘प्रक्रियाकृत भाजीपाल्याचा’ प्रमुख निर्यातदार आहे. या निर्यातीस आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर उठाव असून निर्यात विकसित करण्यास मोठा वाव आहे. ‘प्रक्रियाकृत भाजीपाला’ मुख्यत्वेकरून USA, UK, जर्मनी, थायलंड, कॅनडा इत्यादी देशांना निर्यात केला जातो. महाराष्ट्र ‘प्रक्रियाकृत भाजीपाला’ निर्यातीत अग्रेसर आहे.
घेरकीन
घेरकिन हा शब्द सामान्यतः चवदार लोणच्याच्या काकडीसाठी वापरला जातो. घेरकिन्स आणि व्यावसायिक काकडी एकाच प्रजातीतील आहेत. ते सहसा 4 ते 8 ‘सेंटी मीटर’ (1 ते 3 इंच) लांबीचे आणि ‘जार’ किंवा ‘कॅन’मध्ये व्हिनेगर किंवा ब्राइनसह पॅक केले जाते. भारत आज सर्वोत्कृष्ट घेरकिनची लागवड, प्रक्रिया आणि निर्यात करणारा देश म्हणून उदयास आला आहे. घेरकिनची लागवड, प्रक्रिया आणि निर्यात भारतात १९९० च्या दशकाच्या सुरूवातीस दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातून माफक प्रमाणात सुरू झाली आणि नंतर तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या शेजारील राज्यांमध्ये विस्तारली. घेरकीनची निर्यात मुख्यत्वेकरून अमेरिका, बेल्जीयम, स्पेन, फ्रांस, रशिया इत्यादी देशात होते.
‘प्रक्रियाकृत फळे’, जूस, पल्प
भारतात असणाऱ्या वातावरणाच्या विविधतेने भारतात अनेक प्रकारची फळे तयार होतात. फळांवर प्रक्रिया करून त्याची निर्यात करण्याची मोठी संधी भारतीय निर्यातदारांना आहे. सुकवलेले अप्रिकॉट, सफरचंद, चेरी, मनुका, ‘जॅम व जेली’, पल्प, इत्यादी, फळांचे ज्युसेस; उदा. , सफरचंद, दर्क्ष, लिंबू, अननस, टोमॅटो, आंबा, इत्यादी. या प्रकारच्या प्रक्रियाकृत फळांच्या पदार्थांची भारतातून मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. २०२०-२१ साली भारतातून ४२८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढी निर्यात झाली. याप्रकारची निर्यात प्रामुख्याने अमेरिका, नेदरलँड, UK व आखाती देशात होते. याप्रकारच्या निर्यातीत तामिळनाडू अग्रेसर आहे तर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. गुजरात, केरळ, हरयाणा इत्यादी राज्ये देखील या प्रकारची निर्यात मोठ्या प्रमाणावर करतात.
धान्याचे पीठ
भारतातून अनेक धान्यांची पिठांच्या स्वरूपात निर्यात होते. यात प्रामुख्याने गहू, राय, मका, तांदूळ इत्यादींचा समावेश होतो. २०२०-२१ साली भारताने २०४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी धान्याच्या पिठांची निर्यात केली. निर्यात प्रामुख्याने USA, UAE, कॅनडा, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांना करण्यात आली. महाराष्ट्राचा यात पहिला क्रमांक लागतो. देशाच्या पिठांच्या निर्यातीत महाराष्ट्राचा ४२% वाटा आहे. गुजरात, तामिळनाडू, केरळ, तेलंगणा इत्यादी राज्यांचा देखील पिठांच्या निर्यातीत मोठा सहभाग आहे.
डाळी
डाळ ही मानवाच्या आहारातील एक महत्वाचा घटक आहे. डाळी या प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत. डाळींच्या वजनात २०% ते २५% प्रथिने असतात. डाळींच्या उत्पादनात भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. भारतातून निर्यात करण्यायोग्य डाळींमध्ये पुढील डाळींचा समावेश होतो: हरभरा, तूर, मूग, उडीद, मसूर, वाटाणे, इत्यादी. डाळींचे उत्पादन प्रामुख्याने पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र इत्यादी राज्यातून होते. २०२१ साली भारतातून डाळींची २८४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढी निर्यात झाली. डाळींची निर्यात, प्रामुख्याने USA (१७%) , चीन (११%) , नेपाळ (९%) , UAE इत्यादी देशांना होते.
शेंगदाणा
शेंगदाण्याच्या उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. मार्च व ऑक्टोबर असे वर्षातून दोन हंगामात शेंगदाण्याचे पीक येत असल्याने शेंगदाणा वर्षभर मिळत राहतो. शेंगदाण्याचे शेल्फ लाईफ देखील बरेच जास्त असते. शेंगदाणा तेलाचा प्रमुख स्रोत आहे. शेंगदाण्याच्या प्रमुख जाती पुढील प्रमाणे आहेत: कादीरी, BG, कुबेर, GAUG, चंद्रा, चित्रा, कौशल, अंबर, इत्यादी. भारतातून ‘कच्चा शेंगदाणा’ तसेच भाजलेले व ‘अवर्णयुक्त शेंगदाण्याची’ मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. शेंगदाण्याच्या निर्यातीत गुजरात राज्याचा प्रथम क्रमांक लागतो, तर दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू व तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. २०२०-२१ साली भारताची शेंगदाण्याची निर्यात ७२७ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी झाली. भारतीय शेंगदाण्याची आयात करणाऱ्या देशात इंडोनेशियाचा प्रथम क्रमांक लागतो. ‘दक्षिण-पूर्व आशियायी देशात’ भारतीय शेंगदाण्याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
गूळ व गोड पदार्थ
गुळाच्या उत्पादनात भारताचा जगात प्रथम क्रमांक लागतो. जगातील ७०% गूळ भारतात तयार होतो. गूळ ऊर्जेचा प्रमुख स्रोत तर आहेच, परंतु गुळापासून शरीराला अनेक औषधी घटक मिळतात. याचबरोबर इतर ‘गोड पदार्थाच्या’ निर्यातीत चॉकोलेट, लिमलेटच्या गोळ्या, बेकारी पदार्थ यांचा समावेश होतो. चॉकोलेट, लिमलेटच्या गोळ्या व बेकारी पदार्थाच्या उत्पादनात व निर्यातीत वेगाने वाढ होत आहे. २०२०-२१ साली भारताने ३५८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी ‘गूळ व इतर गोड पदार्थांची’ निर्यात केली. श्रीलंका, सुदान, नेपाळ, इत्यादी देश प्रामुख्याने या प्रकारच्या पदार्थांची भारतातून आयात करतात. गुळाच्या निर्यातीत भारताचा क्रमांक जगात पहिला आहे.. ‘गूळ व इतर गोड पदार्थांच्या’ निर्यातीत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. महाराष्ट्राचा या विभागातील निर्यातीतील हिस्सा ४५% हुन अधिक आहे. गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांतून देखील मोठ्या प्रमाणावर गूळ व इतर गोड पदार्थांची निर्यात होते.
मद्य पदार्थ
अल्कोहोल हा महत्वाचा घटक असलेल्या पदार्थांना मद्य पदार्थ म्हणतात. प्रामुख्याने तीन प्रकारचे मद्य पदार्थ प्रचलित आहेत. बियर, वाईन व स्पिरिट. बियर मुख्यत्वे सातू पासून तयार केली जाते, तर वाईन द्राक्षापासून तयार केली जाते. ‘स्पिरिट’ वेगवेगळी धान्य आंबवून तयार केली जाते. भारतीय वाईनला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढत आहे. वाईन उत्पादनात आणि निर्यातीत महाराष्ट्र अग्रेसर आहे. २०२१-२१ साली भारताने ३२२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतके मद्य पदार्थ निर्यात केले. UAE, आफ्रिकन देश, सिंगापूर इत्यादी देशांना भारत मद्य पदार्थ निर्यात करतो.
इतर ‘प्रक्रियाकृत खाद्य पदार्थ’
वर नमूद केलेल्या प्रचलित पदार्थांशिवाय इतर अनेक ‘प्रक्रियाकृत खाद्य पदार्थाची’ निर्यात केली जाते. यात पुढील पदार्थांचा समावेश होतो: सुकवलेले सूप, सुकवलेली पेये, आईस्क्रीम, सॉस, केचअप, ‘पान मसाला’, लोणची, पापड, मसाले, इत्यादी. २०२०-२१ साली भारताने इतर प्रक्रियाकृत खाद्यपदार्थांची ७९३ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी निर्यात केली.
२.५ पशु उत्पादन - व्याप्ती व संधी
भारताच्या सामाजिक व आर्थिक जीवनात, ‘पशु उत्पादने’ महत्त्वाची भूमिका बजावतात. ‘पशु उत्पादनात’ मुख्यत्वेकरून दूध, मांस आणि अंडी यांचा समावेश होतो. जगातील एकूण दुग्धोत्पादनात २१.२४ टक्के वाटा असलेला भारत, सर्वात मोठा दूध उत्पादक देश म्हणून उदयास आला आहे. जागतिक ‘अंडी उत्पादनात’ भारताचा वाटा ६.५% आहे. १०९.८५ दशलक्ष म्हशी, १४८.८८ दशलक्ष शेळ्या आणि ७४.२६ दशलक्ष मेंढ्यांसह भारतात दुभत्या जनावरांची जगातील सर्वात मोठी लोकसंख्या आहे. ‘पशु उत्पादनांची’ निर्यात ही भारतीय कृषी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण योगदान दर्शवते. पशु उत्पादनांच्या निर्यातीत, म्हशीचे मांस, मेंढी/बकरीचे मांस, पोल्ट्री उत्पादने, प्राण्यांची चामडी, ‘दूध व दुग्धजन्य पदार्थ’ आणि मध, इत्यादींचा समावेश होतो. भारतातील ‘पशु उत्पादनाची’ निर्यात ३६७०.२४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे. ‘पशु उत्पादनाचा’ वर्गवारी निर्यात तपशील खालील प्रमाणे आहे:
● पशु मांस 3219.85 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स
● प्राणांची कातडी 56.23 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स
● पोल्ट्री उत्पादने 71.48 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स
● दुग्धजन्य उत्पादने 225.91 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स
● नैसर्गिक मध 96.77 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय म्हशीच्या मांसाची मागणी वाढल्याने मांस निर्यातीत अचानक वाढ झाली आहे. भारतातून एकूण ‘पशु उत्पादनांच्या’ निर्यातीत ८९% पेक्षा जास्त योगदान म्हशीच्या मांसाचे आहे. भारतीय ‘पशु उत्पादनांच्या निर्यातीसाठी’ व्हिएतनाम, मलेशिया, इजिप्त UAE, इराक आणि सौदी अरेबिया या मुख्य बाजारपेठा आहेत.
पशु मांस निर्यात
भारतात म्हशी, मेंढ्या आणि शेळ्या, डुक्कर आणि कुक्कुटपालन इत्यादी सर्वात जास्त पशुधन आहे. याचा वापर सामान्यतः मांस उत्पादनांच्या उत्पादनासाठी केला जातो. भारतात सुमारे ३६०० कत्तलखाने आहेत. तसेच भारतात २४ मांस प्रक्रिया केंद्र आहेत, ज्यात १३ ‘शंभर टक्के’, ‘निर्यात केंद्रित’ आहेत. गेल्या एका वर्षात म्हशीच्या मांस प्रक्रियेच्या तीन नवीन निर्यात-भिमुख युनिट्सना मान्यता देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त, मेंढ्या आणि शेळ्या आणि गुरेढोरे यांची साफसफाई, प्रतवारी आणि निर्यात करण्यात गुंतलेली काही प्राणी आवरण युनिट्स आहेत. ‘पशु मांस’ प्रामुख्याने तीन प्रकारात मोडते: (१) म्हशीचे मांस (२) शेळ्या व मेंढ्यांचे मांस व (३) इतर प्राण्यांचे मांस
पशु मांसाच्या निर्यातीत, म्हशीच्या मांसाचा सर्वात मोठा वाटा आहे. २०२०-२१ साली ३१७१ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी निर्यात झाली. त्या खालोखाल ‘शेळ्या व मेंढ्यांचे’ मांस याची निर्यात होते. २०२०-२१ साली ‘शेळ्या व मेंढ्यांच्या’ मांसाची निर्यात ४४.५७ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी झाली तर इतर मांसाची निर्यात ४.२८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी होती. ‘पशु मांस’ मुख्यत्वे ‘दक्षिण-पूर्व आशियायी’ देश व ‘आखाती देशांना’ होते. ‘पशु मांस’ निर्यातीत उत्तर प्रदेशचा पहिला क्रमांक लागतो तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर येतो. या दोन राज्याशिवाय हरियाणा, तामिळनाडू, आंध्रप्रदेश इत्यादी राज्यदेखील मोठ्या प्रमाणावर ‘पशु मांसाची’ निर्यात करतात.
भारतातून प्राण्यांच्या कातड्याची निर्यात देखील मोठ्या प्रमाणावर होते. २०२०-२१ साली भारतातून प्राण्यांच्या कातड्याची निर्यात ५६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढी झाली. ही निर्यात ‘दक्षिण-पूर्व आशियायी’ देश, ‘आखाती देश’ व युरोप या ठिकाणी झाली. या निर्यातीत महाराष्ट्र अग्रेसर असून देशाच्या निर्यातीत महाराष्ट्राचा हिस्सा ५१% आहे.
पोल्ट्री उत्पादन
पोल्ट्री हा आज भारतातील कृषी क्षेत्रातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या विभागांपैकी एक आहे. कृषी पिकांचे उत्पादन वर्षाला १.५ ते २ टक्के दराने वाढत असताना ‘अंडी आणि ब्रॉयलरचे’ उत्पादन मात्र ८ ते १० टक्के दराने वाढत आहे. परिणामी, भारत आता जगातील पाचवा सर्वात मोठा ‘अंडी उत्पादक’ आणि ब्रॉयलरचा अठरावा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. देशात लहान ‘पोल्ट्री ड्रेसिंग’ युनिट्स ची संख्या खूप आहे व ते ड्रेस्ड कोंबड्यांचे उत्पादन करत आहेत. या व्यतिरिक्त ‘चिकन कट’ पार्ट्स आणि इतर चिकन उत्पादन करणारे पाच आधुनिक पोल्ट्री प्रोसेसिंग युनिट्स आहेत.
पोल्ट्री उत्पादनाची २०२०-२१ साली निर्यात ७१ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढी होती. ही निर्यात मुख्यत्वे ओमान, मालदीव, व्हिएतनाम, रशिया, भूतान इत्यादी देशांना केली गेली. ‘पोल्ट्री उत्पादनाची’ निर्यात प्रामुख्याने तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा या राज्यातून होते.
दुग्ध उत्पादन
दुग्ध उत्पादनात भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. भारताचे ‘दुग्ध उत्पादन’ दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अमेरिका देशाच्या ५०% अधिक तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या तिप्पट आहे. २०१८-१९ साली भारताचे दूध उत्पादन १८७ दशलक्ष टन’ इतके नमूद झाले. महाराष्ट्रात दूध उत्पादन ११.६६ ‘दशलक्ष टन’ इतके असून देशात महाराष्ट्राचा ७ वा क्रमांक लागतो. २०२१-२२ सालापर्यंत देशाचे दूध उत्पादन २०० ‘दशलक्ष टनापर्यंत’ पोहोचण्याचा अंदाज आहे. २०२१-२२ च्या अर्थसंकल्पान्वये दूध प्रक्रियेची क्षमता दुप्पट करण्याचा निर्धार सरकारने मंडला आहे. दूध उत्पादनातील वाढ यामुळे अधिक होण्याची शक्यता आहे. येत्या वर्षात दूध उत्पादनात प्रतिवर्षी ९ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे.
भारताच्या ‘दुग्ध पदार्थांच्या’ निर्यातीत पुढील पदार्थांचा समावेश होतो: दूध, दुधाची पावडर, लोणी, ताक, तूप इ. २०२०-२१ साली भारताची दुग्ध पदार्थांची निर्यात २२६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढी नमूद करण्यात आली आहे. भारताच्या ‘दुग्ध पदार्थांची’ निर्यात प्रामुख्याने, UAE, बांगलादेश, ऊस, भूतान, सिंगापूर, सौदी अरेबिया या देशांना होते. ‘दुग्ध उत्पादनांची’ निर्यात राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, इ. राज्यांतून होते.
नैसर्गिक मध
‘मधमाशी पालन’ हा शेतीपूरक असा महत्वाचा व्यवसाय आहे. मधमाश्या फुलांमधील मकरंदाचे मधामध्ये रुपांतर करतात आणि त्यांना पोळ्याच्या कप्प्यांमध्ये साठवून ठेवतात. जंगलांमधून मध गोळा करण्याचा उद्योग दीर्घकाळापासून अस्तित्वात आहे. मध आणि त्यापासून बनवलेल्या उत्पादनांची बाजारपेठेतील मागणी वाढत असल्याने मधमाशी पालनाचा उद्योग एक ‘टिकाऊ उद्योग’ म्हणून उदयास येत आहे. मध आणि मेण ही ‘मधमाशी पालनातून’ मिळणारी आर्थिकदृष्ट्या महत्वाची दोन उत्पादने आहेत. भारतामध्ये मधमाश्यांच्या चार प्रजाती आहेत. त्या पुढील प्रमाणेः (१) दगडी माशी, ‘अपीस डोरसाटा’ (२) लहान माशी, ‘अपीस फ्लोरिआ’ (३) ‘अपीस सेराना इंडीका’ (४) ‘डंखरहित मधमाशी’
२०२०-२१ साली भारताची मधाची निर्यात ९६.७७ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढी होती. मधाची निर्यात प्रामुख्याने USA ला होते. आखाती देशातही भारतीय मधाची निर्यात होते. हरयाणा, पंजाब व उत्तर प्रदेश ही राज्ये प्रामुख्याने मधाची निर्यात करतात.
२.६ तृणधान्य - व्याप्ती व संधी
तृणधान्यांच्या उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. भारताच्या शेती उत्पादनात २४ ‘दशलक्ष हेक्टर’ जमीन तृणधान्यांच्या लागवडीखाली आहे. भारतात असणाऱ्या वातावरणाच्या विविधतेमुळे अनेक प्रकारची तृणधान्य उत्पादन करण्याची क्षमता भारताकडे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तृणधान्यांची वाढती मागणी आणि देशातील तृणधान्यांचे मुबलक उत्पादन यामुळे देशाला तृणधान्य निर्यातीत मोठी संधी आहे व पुढील काही वर्षांत ती अनेक पटीने वाढण्याची शक्यता आहे. भारतात उत्पादन होत असलेल्या तृणधान्यांत पुढील धान्यांचा समावेश होतो: गहू, तांदूळ, मका, बाजरी, ज्वारी, इत्यादी. २०१८-१९ च्या आकडेवारीप्रमाणे भारताचे तृणधान्यांचे उत्पादन २८५ ‘दशलक्ष टन’ इतके नमूद केले आहे.
तृणधान्यांच्या निर्यातीत भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. भारताच्या शेतीमाल निर्यातीच्या ४८% हिस्सा तृणधान्यांचा आहे. २०२०-२१ च्या आकडेवारीप्रमाणे भारताची तृणधान्यांची निर्यात १०,०६४ ‘दशलक्ष अमेरिकन डॉलर्स ’ इतकी आहे. याची वर्गवारी खालील प्रमाणे आहे:
TABLE
बासमती व इतर तांदूळ
भारताचा बासमती तांदूळ जगभरात प्रसिद्ध आहे व त्याला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. बासमती तांदूळ त्याच्या लांब दाण्यासाठी आणि स्वादिष्टतेसाठी प्रसिद्ध आहे. शिजवल्यावर बारामतीच्या दाण्याची लांबी वाढते. बासमती तांदुळाच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या हवामानामुळे हा तांदूळ मुख्यत्वेकरून पंजाब, हरयाणा या राज्यात उत्पादित केला जातो. बासमती तांदुळाच्या ३४ हुन अधिक जातींची नोंद केलेली आहे.
बसमतीशिवाय तांदुळाच्या इतरही अनेक जाती प्रचलित आहेत व भारत या जातींच्या उत्पादनात देखील अग्रेसर आहे. बासमती शिवाय तांदुळाच्या इतर १०,००० जाती नमूद केल्या आहेत व त्यापैकी बऱ्याचशा जाती भारतात उत्पादित केल्या जातात.
भारताच्या निर्यातीत बासमती तांदुळाचा महत्वाचा वाटा आहे. २०२०-२१ च्या आकडेवारीप्रमाणे बासमती तांदुळाची, देशाची निर्यात ४,०१८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी नमूद करण्यात आली आहे. तर इतर जातीच्या तांदुळाची देशाची निर्यात ४,७९९ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी नमूद करण्यात आली आहे. बासमती व इतर तांदुळाचा एकत्र विचार केला असता, २०२०-२१ च्या आकडेवारीप्रमाणे तांदुळाची देशाची निर्यात ८,८१८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी नमूद करण्यात आली आहे. ही तृणधान्यांच्या निर्यातीच्या ८७% तर अपेडा अंतर्गत असणाऱ्या शेतीमालाच्या सर्वात जास्त म्हणजे ४३% एवढी भरते.
बासमती तांदूळ आखाती देश, अमेरिका, UK, कॅनडा इत्यादी देशांना निर्यात केला जातो. तर इतर जातींचा तांदूळ नेपाळ, बांगलादेश, ‘आखाती देश’, ‘दक्षिण-पूर्व आशियायी देश’, चीन इत्यादी देशांना निर्यात केला जातो.
गहू
भारतातील गव्हाची लागवड प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणा या भारताच्या उत्तरेकडील प्रदेशात केली जाते. गव्हाच्या पिकावर अनेक वर्षांपासून अभ्यास झाला असला, तरी अलिकडच्या काळातील परिश्रमपूर्वक संशोधनामुळे गव्हाच्या विशिष्ट जाती विकसित झाल्या आहेत. गव्हातील घटक व त्यांचे गुणधर्म यामुळे गव्हाला दैनंदिन आहारामध्ये फार मोठे स्थान आहे. गहू शरीराला लागणाऱ्या ऊर्जेचा हा एक महत्वाचा स्रोत मानला जातो.. पारंपरिकरित्या भारत गव्हाचा एक प्रमुख उत्पादक असला तरी गेल्या पाच वर्षात भारताचे गव्हाचे उत्पादन पाचपट झाले आहे. गव्हाच्या जागतिक उत्पादनात भारताचा आज दुसरा क्रमांक लागतो.
गव्हाच्या प्रमुख जाती पुढील प्रमाणे आहेत: VL-832,VL-804, HS-365, HS-240 , HD2687,WH-147, WH-542, PBW-343, WH-896(d), PDW-233(d), UP-2338, PBW-502, HD 2687, HD 2781, HW-2044, HW-1085, NP-200(di), HW-741.
२०२०-२१ च्या आकडेवारीप्रमाणे गव्हाची निर्यात ५४९ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी नमूद करण्यात आली आहे. तृणधान्यांच्या निर्यातीत गव्हाचा हिस्सा ५% इतका आहे. गव्हाची निर्यात, प्रामुख्याने नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, UAE इत्यादी देशांना होते.
मका
विविध तापमान व वातावरणात चांगल्याप्रकारे उत्पन्न देणारे मका हे पीक आहे. मक्याचे पीक जगभर लोकप्रिय आहे. जागतिक धान्य उत्पादनात, मक्याचा हिस्सा ३९% इतका आहे. अमेरिका हा मक्याचा सर्वात मोठा उत्पादक आहे व जगाच्या ३६% मका अमेरिकेत पिकतो. भारतात तांदूळ आणि गव्हानंतर मका हे सर्वात मोठे पीक आहे. देशातील एकूण अन्नधान्यात मक्याचा वाटा १०% इतका आहे. अनेक खाद्यपदार्थ व इतर उद्योग व्यवसायात कच्चा माल म्हणून मका वापरला जातो.
२०२०-२१ च्या आकडेवारीप्रमाणे मक्याची निर्यात ६३४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी नमूद करण्यात आली आहे. तृणधान्यांच्या निर्यातीत मक्याचा हिस्सा ६% इतका आहे. मक्याची निर्यात प्रामुख्याने नेपाळ, बांगलादेश, व्हिएतनाम इत्यादी देशांना होते. पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र इत्यादी राज्ये मक्याची प्रमुख निर्यातदार आहेत.
इतर तृणधान्ये
इतर तृणधान्यात ज्वारी, बाजरी, नाचणी, इत्यादी पिकांचा अंतर्भाव होतो. तांदूळ, गहू व मका याप्रमाणे ही तृणधान्ये देखील शरीराला लागणाऱ्या ऊर्जेचे प्रमुख स्रोत आहेत. ही पिके कोरडवाहू पिके म्हणून प्रसिद्ध आहेत व अतिशय कमी पाण्यात ही पिके काढता येतात.
२०२०-२१ च्या आकडेवारीप्रमाणे इतर तृणधान्याची निर्यात ६० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी नमूद करण्यात आली आहे. इतर तृणधान्यांची निर्यात प्रामुख्याने, UAE, USA, नेपाळ, इत्यादी देशांना होते. गुजरात, महाराष्ट्र, बिहार, तामिळनाडू इत्यादी राज्ये प्रमुख निर्यातदार आहेत.