५. निर्यात - हाताळणी व वाहतूक 

निर्यात पूर्व हाताळणी व आंतरराष्ट्रीय वाहतूक

५.१. परिचय

शेती माल कसा निर्यात करावा व निर्यातीची कार्य प्रणाली काय यावरील अनेक विषयांवर कोर्स शृंखला तयार करण्यात आली आहे. हा कोर्स त्यापैकी निर्यात मालाची हाताळणी व वाहतूक याबाबतीत आहे. कार्य प्रणालीचे विवेचन पुढील विभागात केले आहे:

( १ ) परिचय

( २ ) पॅकिंग व साठवणूक

( ३ ) आंतरराष्ट्रीय वाहतूक

( ४ ) आंतरराष्ट्रीय वाहतूक - हवाई मार्ग

( ५ ) आंतरराष्ट्रीय वाहतूक - समुद्री मार्ग

( ६ ) इन्कोटर्म्स

५.२. पॅकिंग व साठवणूक

शेती व खाद्यपदार्थ निर्यातीत मालाचे पॅकिंग व योग्य साठवणूक अत्यंत महत्वाची आहे. मालाची गुणवत्ता राखणे, मालाची हाताळणी सहज करता येणे, तसेच इतर अनेक कारणासाठी मालाचे योग्य पॅकिंग व साठवणूक करणे आवश्यक असते . त्याचबरोबर कायद्याने प्रत्येक पॅकिंगवर योग्य लेबल लावणे आवश्यक असते. प्रत्येक निर्यातदाराला पॅकिंग, लेबल पद्धती व साठवणुकींचे प्रकार व त्यांची योग्य निवड याबाबत माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. या भागात पॅकिंग व साठवणुकीचे प्रकार व त्यांची निवड या बाबत सविस्तर माहिती घेऊ.

 

पॅकिंग

पिकाच्या काढणी पश्चात शेतमालाचे ग्राहकांपर्यंत वितरण, हे अत्यंत महत्वाचे आहे. शेतमालास आवश्यक प्रक्रिया करून तो योग्य प्रकारे पॅक करणे आवश्यक आहे. लांब पल्ल्याची वाहतूक, मालाची अनेक वेळा होणारी हाताळणी, हवामानातील बदल या सर्व बाबींचा संपूर्ण विचार करून मालाला योग्य पॅकिंग देणे जरुरीचे असते. योग्य पॅकिंग निवडताना खालील गोष्टींचा विचार केला जातो:

●  वाहतुकीच्या धक्यांपासून संरक्षण

●  सूक्ष्म जीवजंतू व कीटकांपासून संरक्षण

●  पॅकिंगच्या साहित्यातून शेती मालात रसायने उतरू नये याची खबरदारी

●  मालाचे ‘रॅपिड कोडिंग’

●  पॅकिंग मधून माल स्वच्छ दिसेल याची खबरदारी

●  मालाच्या वापरानंतर पॅकिंग सामानाची सहज विल्हेवाट शक्य व्हावी

●  पॅकिंगची किंमत वाजवी असावी

प्रचलित पॅकिंग पद्धतीत प्रामुख्याने खालील प्रकारचे पॅकिंग केले जाते. पॅकिंग पद्धतीचे संक्षिप्त वर्णन पुढील भागात केले आहे :

●  पोती

●  कोरोगेटेड बॉक्स

●  लाकडी पेट्या

●  नियंत्रित - वातावरण पॅकिंग

●  सुधारित - वातावरण पॅकिंग

●  व्हॅक्युम पॅकिंग

पोती : ताग किंवा तत्सम नैसर्गिक सामग्रीपासून पारंपरिक पद्धतीने पोती बनवली जातात. नवीन पद्धतीत पॉलिप्रोपिलीन प्रकारची पोती खूप प्रचलित झाली आहेत. लहान आकाराच्या पॅकिंगमध्ये कागदाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. किडीचा प्रादुर्भाव पॉलिप्रोपिलीन किंवा कागदाच्या पॅकिंग मध्ये बऱ्याच प्रमाणात कमी होतो. त्यांचे दर्शनी स्वरूपही चांगले असते.

कोरोगेटेड बॉक्स : कोरोगेटेड बॉक्सचे पॅकिंग सध्या बऱ्याच प्रमाणात वापरले जाते. कमी वजन, मजबुती, आकाराची लवचिकता, साठवण्यास आणि वाहतुकीस सुलभ, अशा अनेक फायद्यांमुळे कोरोगेटेड बॉक्स लोकप्रिय झाले आहेत. कोरोगटेड बॉक्समधील पॅकिंग वाजवी खर्चात होऊ शकते.

लाकडी पेट्या : लाकडी पेट्या नैसर्गिक लाकूड किंवा प्लायवूड यापासून तयार केल्या जातात. जास्त वजन घेण्याची क्षमता, अनेकवेळा हाताळणी करण्यास योग्य, वाजवी दर, अशा अनेक कारणांनी लाकडी पेट्या शेती मालाच्या पॅकिंगसाठी वापरल्या जातात.

‘नियंत्रित-वातावरण’ पॅकिंग : फळे आणि भाज्या वातावरणातील ऑक्सिजन सेवन करून खराब होतात. हे थांबवण्याचे तीन मार्ग आहेत. प्रथम म्हणजे आसपासचे तापमान कमी करणे; दुसरे म्हणजे ऑक्सिजन कमी करणे व तिसरे म्हणजे कार्बन डाय-ऑक्साईडचे प्रमाण वाढविणे. नियंत्रित वातावरण पॅकिंगमध्ये या तिन्हींचा उपयोग करून फळे व भाजीपाला यांचे ‘शेल्फ लाईफ’ वाढवले जाते.

‘सुधारित-वातावरण’ पॅकिंग : ‘सुधारित-वातावरण’ म्हणजे ‘शेल्फ लाइफ’ सुधारण्यासाठी पॅकेजच्या अंतर्गत वातावरणाची रचना बदलणे. ऑक्सिजनच्या उपस्थितीत मांस, मासे आणि दुध यांसारखे पदार्थ खराब होतात. ‘सुधारित-वातावरण’ पॅकेजमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी करून नायट्रोजन, आर्गॉन किंवा कार्बन डाय-ऑक्साईड वापरले जाते. यामुळे माल खराब होण्याची प्रक्रिया थांबते.

व्हॅक्युम पॅकिंग : ‘व्हॅक्यूम पॅकिंग’ ही पॅकेजिंगची एक अत्याधुनिक पद्धत आहे ज्यात सील करण्यापूर्वी पॅकेजमधून हवा काढली जाते. या पद्धतीमध्ये ‘प्लास्टिक फिल्म पॅकेजमध्ये’ वस्तू ठेऊन आतून हवा काढली जाते आणि पॅकेज सील केले जाते. ‘व्हॅक्यूम-पॅकिंगचा’ हेतू कंटेनरमधून ऑक्सिजन काढून खाद्यपदार्थांचे ‘शेल्फ लाइफ’ वाढविणे असा आहे.

लेबल

पॅकिंग प्रमाणेच लेबलची आवश्यकता निर्यातदाराला समजणे आवश्यक आहे. लेबलवर दिल्याजाणाऱ्या ‘संकेत चिन्हांची’ माहिती निर्यातदाराला असणे आवश्यक आहे. लेबल सामान्यतः इंग्लिशमध्ये असावीत. आयात करणाऱ्या देशातील नियम, माल कसा हाताळावा, कसा वापरावा, वस्तू वापरल्यानंतर पॅकिंगची विल्हेवाट कशी लावावी, इत्यादी माहिती लेबल मध्ये असावी. लेबल वाचनीय आकारात असावे. लेबलमध्ये खालील महत्वाची माहिती देणे आवश्यक आहे :

●      वस्तूचे नाव

●      निर्यातदाराचे नाव व पत्ता

●      उत्पादक देश

●      वजन व आकारमान

●      पॅकिंग केल्याची तारीख

●      उत्पादन संबंधी ओळख क्रमांक किंवा उत्पादन तुकडी

●      माल वापरण्याची अंतिम तारीख

●      वास्तूतील रासायनिक घटक

●      हाताळण्याबाबतच्या सूचना असणारी ‘संकेत चिन्हे’

●      माल घटक असल्यास तसे ‘सूचना चिन्ह’

 

साठवणूक

निर्यात व्यवसायात माल निर्यात स्थळी पोहोचेपर्यंत मालाची साठवणूक अनेक वेळा करणे भाग पडते. शेती व्यवसायात माल एकाच वेळी तयार होतो. सर्व माल एकाचवेळी बाजारात आल्यास मालाला वाजवी किंमत मिळत नाही. यासाठी माल गोदामात ठेऊन मागणीप्रमाणे माल विकावा लागतो. मागणी व बाजारभाव यांचा विचार करून माल बाजारात आणावयाचा असेल, तर माल गोदामात ठेवणे आवश्यक असते.

शेती व्यवसायात बरेच उत्पादन नाशवंत असते. तसेच कीड, उंदीर इत्यादींमुळे माल खराब होण्याची अधिक संभावना असते. यामुळे व्यवसायात मोठे नुकसान होऊ शकते. याचसाठी मालाची साठवणूक योग्य प्रकारच्या गोदामामध्ये करणे आवश्यक असते. मालाचा प्रकार, साठवणुकीचा वेळ व साठवणुकीचे नियम यावरून योग्य असे गोदाम निवडणे आवश्यक असते. मालाची योग्य साठवणूक करण्यासाठी खालील प्रमुख बाबी विचारात घेणे आवश्यक आहे:

‘साठवणाच्या’ मूलभूत आवश्यकता : ‘शेती माल’ साठवणूक करण्यासाठी काही मूलभूत आवश्यकता आहेत. पाऊस, थेट सूर्यप्रकाश, आर्द्रता, उष्णता इ. पासून माल वाचवणे आवश्यक आहे. गोदामांची सामान्य स्वच्छता राखून बुरशी, कीड, उंदीर यांचा प्रादुर्भाव टाळणे आवश्यक आहे. पक्क्या इमारती, नैसर्गिक अथवा कृत्रिम वायुविजन यांनी सुसज्ज अशा गोदामांची निवड करून वरील आवश्यकता साधता येतात. .

‘साठवणाचे’ तापमान : शेती माल व इतर खाद्य पदार्थ कमी तापमानात साठवल्यास त्यांचे आयुष्य ( शेल्फ लाईफ ) बरेच वाढू शकते. फळे, भाजीपाला व इतर हरित पदार्थ कालांतराने शिळे होतात व शेवटी खराब होतात. याचे प्रमुख कारण वनस्पतीत होणारी नैसर्गिक ‘श्वसन प्रक्रिया’. वातावरणाचे तापमान कमी झाल्यास या ‘श्वसन प्रक्रियेचा’ वेग कमी होतो व फळे, भाजीपाला प्रदीर्घ काळ ताज्या राहातात. प्रत्येक फळ व भाजीपाला यांच्यासाठी साठवणुकीसाठीचे योग्य तापमान वेगवेगळे असते; आणि त्याप्रमाणे पदार्थाची साठवणूक कमी तापमानात केली जाते.

‘साठवणाची’ आर्द्रता : कोणत्याही फळे व भाजीपाला यांत पाणी हा सर्वात मोठा घटक असतो. जेव्हा फळे व भाजीपाला यातील पाण्याचा अंश कमी होतो, तेव्हा पदार्थ सुकतो व त्यातील टवटवीतपणा नाहीसा होतो. सभोवतालच्या वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण जास्त ( फळे व भाजीपालायांतील आर्द्रतेइतके ) असल्यास फळे व भाजीपाल्यातील पाण्याचे बाष्पीभवन बऱ्याच कमी प्रमाणात होते. यामुळे फळे व भाजीपाला यातला ताजेपणा व टवटवीतपणा बराच काळ कायम राहतो. प्रत्येक फळ व भाजीपाला साठवणुकीसाठी आवश्यक असलेली आर्द्रता वेगवेगळी असते; त्याप्रमाणे साठवणूक वाढीव आर्द्रतेत केली जाते.

‘साठवणाचे’ वातावरण : वर नमूद केल्याप्रमाणे फळे, भाजीपाला व इतर वनस्पतीत नैसर्गिक ‘श्वसन प्रक्रिया’ चालू असते. नैसर्गिक वातावरणात ७८% नैट्रोजन, २१% प्राणवायू व ०.०३% कार्बन डाय-ऑक्साईड असते. श्वसन प्रक्रियेत वनस्पती वातावरणातील प्राणवायू शोषते व त्याबदल्यात कार्बन डाय-ऑक्साईड चे उत्सर्जन करते. वातावरणातील प्राणवायू कमी केल्यास अथवा कार्बन डाय-ऑक्साईड वाढवल्यास वनस्पतीच्या ‘श्वसन प्रक्रियेचा वेग मंदावतो हळू होते आणि वनस्पतीचे ‘शेल्फ लाईफ’ बऱ्याच प्रमाणाने वाढते. या तत्वाचा वापर करून ‘नियंत्रित-वातावरण साठवणूक’ ( Controlled Atmosphere Storage, CAS ) अथवा ‘सुधारित-वातावरण साठवणूक’ ( Modified Atmosphere Storage, MAS ) या दोन पद्धतीने फळे व भाजीपाला यांचे ‘शेल्फ लाईफ’ वाढवले जाते. CAS पद्धतीत गोदामाच्या वातावरणातील प्राणवायूचे प्रमाण कमी केले जाते आणि कार्बन डाय-ऑक्साईडचे प्रमाण वाढवले जाते. साठवणुकीच्या काळात हे प्रमाण कृत्रिमरित्या समान राखले जाते. MAS पद्धतीत, CAS पद्धतीप्रमाणेच वातावरणातील प्राणवायूचे प्रमाण कमी केले जाते आणि कार्बन डाय-ऑक्साईडचे प्रमाण वाढवले जाते. परंतु MAS पद्धतीत वनस्पतीच्या श्वसनाने आजूबाजूच्या वातावरणात बदल होत राहतो.

५.३ आंतरराष्ट्रीय वाहतूक

निर्यात व्यवसायात मालाची योग्य प्रकारे आंतरराष्ट्रीय वाहतूक करणे अत्यंत महत्वाची ठरते. मालाचा प्रकार, वाहतुकीस लागणारा वेळ, वाहतुकीची किंमत इत्यादींचा विचार करून योग्य वाहतुकीचा प्रकार निवडला जातो. प्रगत देशाच्या तुलनेत भारतात वाहतुकीचा खर्च बराच जास्त आढळतो. प्रसिद्ध झालेल्या अहवालाप्रमाणे भारतात GDP च्या १४% खर्च वाहतुकीस लागतो. याउलट अमेरिका, जर्मनी, जपान, इत्यादी प्रगत देशात हा खर्च ८% ते ११% आढळतो. वाहतुकीचा खर्च कमी झाल्यास भारताची निर्यात नक्कीच सुधारेल. यासाठी वाहतुकीच्या असलेल्या पर्यायांचा अभ्यास करून योग्य पर्याय निवडणे अतिशय महत्वाचे आहे. आंतरराष्ट्रीय वाहतुकीचे कोणते प्रचलित प्रकार आहेत व त्याची निवड कशी करावी याचे विश्लेषण या भागात केले आहे.

आंतरराष्ट्रीय वाहतुकीच्या प्रचलित प्रकारात प्रामुख्याने रस्ते-वाहतूक, रेल-सेवा, ‘हवाई वाहतूक’ व ‘समुद्री वाहतूक’ यांचा समावेश होतो. योग्य वाहतुकीचा प्रकार निवडण्याचे कोणते निकष आहेत हे आपण या भागात समजावून घेऊ.

मालाचे स्वरूप : निर्यात करावयाच्या मालाचे स्वरूप काय आहे याला वाहतुकीच्या निवडीत अतिशय महत्त्व आहे. माल नाशवंत आहे का? त्याचे शेल्फ लाईफ किती आहे? वाहतूक करताना सभोवती तापमान किंवा वातावरण याचे नियंत्रण आवश्यक आहे का? माल तकलादू असल्यास माल हाताळताना विषेश काळजी घेणे आवश्यक आहे का? माल स्फोटक प्रकारात मोडतो का? या प्रश्नांची उत्तरे माल वाहतुकीचा प्रकार निवडताना महत्वाची ठरतात. मालाचे स्वरूप व त्यामुळे वाहतुकीदरम्यान घेण्याची काळजी यावरून योग्य वाहतुकीचा प्रकार निवडला जातो.

शिपमेंटचे वेळापत्रक : खरेदीदाराला निर्यात माल कधी पाहिजे यावरून देखील माल वाहतुकीचा प्रकार ठरावाला जातो. माल ठराविक वेळी पोहोचणे आवश्यक असल्यास वाहतुकीस उपलब्ध असलेला वेळ व त्या वेळात माल पोहोचेल याची शाश्वती ज्या माल वाहतुकीच्या प्रकारात शक्य आहे, असा वाहतुकीचा प्रकार निवडला जातो.

वाहतूक सेवेची विश्वासार्ह्यता : वाहतुकीचा प्रकार निवडताना त्याची विश्वासार्हता पडताळणे आवश्यक आहे. सेवा नियमित वेळेस निघून नियमित वेळेत पोहोचहते किंवा नाही, अपरिहार्य कारणाने वाहतुकीची एखादी फेरी चुकली तर लवकरात लवकर दुसरी फेरी आहे अथवा नाही, मालाची योग्य हाताळणी करण्यात व मालाची नासधूस न होता ठरलेल्या ठिकाणी पोहोचवण्यात सेवेबाबतचा अनुभव काय आहे यांवरून वाहतूक प्रकार निवडला जातो.

मालाचे वजन व आकारमान : शिपमेंटचे वजन व आकारमान यावरून देखील वाहतुकीचा प्रकार ठरतो. एका बॉक्सचे वजन व आकारमान तसेच संपूर्ण शिपमेंटचे वजन व आकारमान काय आहे, निवडलेला वाहतुकीचा प्रकार यापद्धतीचा माल हाताळू शकतो का? याचा अभ्यास करून मगच योग्य वाहतुकीच्या पर्यायाची निवड केली जाते. उदा. अतिशय मोठ्या आकाराच्या किंवा खूप लहान आकाराच्या वस्तू हाताळण्याची व वाहहतूक करण्याची पद्धत निराळी असते.

वाहतुकीचा खर्च : वाहतुकीचा पर्याय निवडताना सर्वात महत्वाची बाब म्हणजे वाहतुकीला लागणारा खर्च. वाहतुकीला योग्य अशा पर्यायांची प्राथमिक निवड केल्यानंतर त्यातील कमी किमतीचा पर्याय निवडला जातो. मालाच्या किमतीत वाहतुकीचा खर्च परवडतो किंवा नाही ही सर्वात महत्त्वाची बाब ठरते. माल वाहतूक करण्यास तांत्रिक दृष्ट्या सर्वात योग्य पर्याय व त्याचा खर्च यांचा योग्य ताळमेळ साधून मग पर्याय नक्की केला जातो.

रस्ते व रेल्वे वाहतूक

वर नमूद केल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय वाहतुकीत प्रचलित प्रकार पुढील प्रमाणे आहेत: रस्ते वाहतूक, हवाई वाहतूक व सागरी वाहतूक. या भागात आपण रस्ते व रेल्वे वाहतुकीची माहिती घेऊ.

नेपाळ, बांगलादेश, भूतान, पाकिस्तान व चीन या शेजारी देशांना निर्यात रस्ते वाहतुकीने होतो. परंतु भारताच्या निर्यातीत याचा वाटा कमी आहे. २०१७-१८ च्या आकड्याप्रमाणे शेजारी देशांशी होणारी ही निर्यात संपूर्ण निर्यातीच्या केवळ १.५६% आहे. यात नेपाळचा पहिला क्रमांक लागतो तर बांगलादेश दुसऱ्या क्रमांकावर येतो. भारत बांगलादेश व पाकिस्तान या दोन शेजारी देशांशी रेल्वे मार्गानेही जोडला आहे. नेपाळसाठीही नुकतीच रेल्वेसेवा सुरु करण्यात आली आहे. परंतु रेल्वे सेवेद्वारा निर्यात फारच कमी प्रमाणात होते.

रस्ते व रेल्वे वाहतुकीने माल निर्यात करणे हा सर्वात सोपा प्रकार आहे. माल गाडीत भरल्यानंतर तो थेट ग्राहकापर्यंत पोहोचू शकतो. मालाची परतपरत चढ उतार होत नसल्याने मालाची सुरक्षितता सांभाळता येते. मालाची नासधूस कमी होते. रस्ते व रेल्वे वाहतूक बऱ्याच वेळा कमी खर्चात करता येते. परंतु लांब पल्ल्याच्या प्रवासास बराच वेळ लागतो. रस्ते व रेल्वे वाहतुकीत कुशल कामगार व प्रणालीचा अभाव जाणवतो. यात नाशवंत माल खराब होण्याची शक्यता असते. यामुळे रस्ते वाहतूक केवळ सीमेवरील निर्यातदारांना योग्यस ठरते.

५.४ आंतरराष्ट्रीय वाहतूक - हवाई मार्ग

मागच्या भागात ‘आंतरराष्ट्रीय वाहतुकीचे’ प्रकार कोणते आणि त्यांची योग्य निवड कोणत्या निकषाने करावी याबाबतचे विवेचन समजावून घेतले. या भागात आपण हवाई वाहतुकीबाबत माहिती घेऊ.

‘हवाई वाहतूक’ हा निर्यात मालाच्या वाहतुकीचा एक महत्वाचा पर्याय आहे. कमीतकमी वेळात वाहतूक करण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे. परंतु त्याच बरोबर हवाई वाहतुकीचा खर्चही जास्त असतो. आंतरराष्ट्रीय व्यापारात अंदाजे ३५% मूल्याच्या मालाची वाहतूक हवाई मार्गाने होते. परंतु, मालाच्या वजनाचा विचार केला, तर आंतरराष्ट्रीय मालाच्या केवळ १% वजनाचा माल हवाई वाहतुकीने होतो. मौल्यवान वस्तू, नाशवंत पदार्थ, नाजूक वस्तू, यांची वाहतूक प्रामुख्याने हवाई मार्गाने केली जाते. वर नमूद केलेल्या निकषांवरून आपल्याला निर्यात करायचा असलेल्या मालाला हवाई वाहतूक योग्य आहे अथवा नाही याची चाचणी सर्वप्रथम करणे आवश्यक आहे.

फ्रेट फॉर्वर्डरची नेमणूक :

सर्वप्रथम योग्य ‘फ्रेट फॉर्वर्डर’ ची नेमणूक करणे रास्त असते. ‘फ्रेट फॉर्वर्डर’ला आंतरराष्ट्रीय वाहतुकीची अद्यावत माहिती असते. मालाचा प्रकार, आयात करणारा देश, वाहतुकीचा खर्च इत्यादींचा विचार करून योग्य वाहतूक प्रकारची निवड करण्याची क्षमता ‘फ्रेट फॉर्वर्डर’ कडे असते. आंतरराष्ट्रीय वाहतूक करणाऱ्या ‘एअर लाईन’ च्या गरजा व नियम यांची त्यांना माहिती असते. तसेच माल विमानतळावर आल्यापासून ते माल विमानात चढवण्याची प्रक्रिया व हाताळणी याचा त्यांना अनुभव असतो. ‘एअर लाईन’, ‘सीमाशुल्क विभाग’ यांच्यासोबत समन्वय साधण्याची जबाबदारी ‘फ्रेट फॉर्वर्डर’ घेतो.

खर्चाच्या अंदाजाची मागणी ( Request for Quotation, RFQ):

सर्वप्रथम शिपमेंटला लागणाऱ्या खर्चाचा अंदाज ‘फ्रेट फॉर्वर्डर’ कडून घेणे आवश्यक असते. ‘फ्रेट फॉर्वर्डरने’ दिलेला हा खर्चाचा अंदाज त्याला बंधनकारक असतो. शिपमेंटच्या परिस्थितीत काही बदल झाल्यासच हा अंदाज बदलू शकतो. खर्चाचा अंदाज अचूक मिळण्यासाठी शिपमेंटची अचूक माहिती ‘फ्रेट फॉर्वर्डरला’ देणे आवश्यक असते. खर्चाचा अंदाज घेण्यासाठी पुढील माहिती ‘फ्रेट फॉर्वर्डरला’ देणे आवश्यक असते :

●      बॉक्सेसची संख्या

●      प्रत्येक बॉक्सचे वजन, लांबी, रुंदी व उंची

●      माल कोठून उचलावयाचा आहे

●      माल कोणत्या विमानतळावरून निर्यात करावयाचा आहे

●      माल कोणत्या देशात व कोणत्या विमानतळावर पोहोचवायचा आहे

●      माल पुढे ग्राहकांपर्यंत पोहोचावयाचा असेल तर तो पत्ता

●      माल ‘घातक वस्तू’ ( dangerous goods ) मध्ये मोडतो का?

●      मालाला तापमान नियंत्रणाची आवश्यकता आहे का?

●      मालाचा HSN कोड काय आहे?

●      खर्चात कोणत्या सेवांचा अंतर्भाव असावा?

खर्चाचा अंदाज ( Quotation )

वरील माहिती ‘फ्रेट फॉर्वर्डरला’ दिल्यानंतर ‘फ्रेट फॉर्वर्डर’ खर्चाचा अंदाज देतो. अंदाज सर्वसाधारणपणे खालील स्वरूपात दिला जातो:

●      Minimum : Rs. ---

●       - 45 : Rs. --- / kg

●      Q 45 : Rs. --- / kg

●      Q 100   : Rs. --- / kg

●      Q 300 : Rs. --- / kg

●      Q 500 : Rs. --- / kg

वरील अंदाजात हवाई वाहतुकीची ‘प्रति किलो’ किंमत वजनाप्रमाणे दिली जाते. सर्व बॉक्सेसचे मिळून वजन जर ४५ किलो पेक्षा कमी असेल तर ‘- 45’ ह्या रकान्यातला दर लागू होतो. परंतु खर्च कमीतकमी ‘Minimum’ ह्या रकान्याएवढे असते. तसेच वजन ४५ किलो पेक्षा जास्त व १०० किलो पेक्षा कमी असल्यास ‘Q 45’ ह्या रकान्यातला दर लागू होतो. याचप्रमाणे तक्त्यातील पुढील दर लागू केले जातात. हवाई वाहतुकीचे दर ‘Basic Rate’ व ‘Fuel Surcharge’ यामद्धे विभागून देण्याचा प्रघात आहे. हवाई वाहतूक दराशिवाय पुढील खर्च देखील अंदाजात दिला जातो:

●      टर्मिनल खर्च ( Terminal charges )

●      सुरक्षा खर्च ( Security charges )

●      हाताळणी खर्च ( Handling Charges )

●      ‘एअरवे बिल’ खर्च ( Airway Bill Charges )

●      ‘सीमाशुल्क मंजुरी’ खर्च ( Custom Clearance charges)

आकारणी वजन ( Chargeable Weight ) :

‘हवाई वाहतूक’ करणाऱ्या विमानाची माल ने-आण करण्याची क्षमता जशी वजनावर अवलंबून असते, तशीच ती आकारमानावरही अवलंबून असते. उदाहरणार्थ, कापसासारखी वस्तू वजनाच्या मानाने बरीच हलकी असते, त्यामुळे हवाई वाहतूक करणारे विमान आकारमानाच्या असलेल्या मर्यादेमुळे कमी वजनाचा कापूस घेऊन जाते. याउलट लोहपदार्थाची वाहतूक करावयाची असेल तर विमानाची क्षमता वजनावरून मर्यादित होते. याचा विचार करून विमान वाहतुकीत खर्च ‘आकारणी वजन’ ( Chargeable Weight ) याप्रमाणे आकारला जातो. मालाच्या आकारमानावरून काढलेल्या वजनाला ‘Volumetric Weight’ असे म्हणतात. मालाचे ‘Volumetric Weight’ आणि ‘प्रत्यक्ष वजन’ ( kg ) यापैकी जे जास्त असेल त्याला ‘आकारणी वजन’ असे म्हणतात. ‘Volumetric Weight’ काढायची पद्धत खालील प्रमाणे आहे.

●      ‘Volumetric Weight’ = सर्व बॉक्सेसचे वजन ( cm 3 ) / ६०००

‘हवाई वाहतूक’ प्रणाली :

माल तयार झाल्यानंतर ‘फ्रेट फॉर्वर्डर’ हवाई वाहतुकीची व्यवस्था करतो. शिपमेंट गोदामातून निघून विमानात चढवण्यापर्यंतची प्रणाली पुढील प्रमाणे असते. प्रक्रियेत लागणाऱ्या दस्तऐवजांचीसविस्तर माहिती ‘निर्यात - प्रलेखन’ या अभ्यासक्रमात दिली आहे. त्यामुळे येथे त्या दस्तऐवजांचा केवळ संदर्भ दिला आहे :

कृती १ : सर्वप्रथम ज्या विमानतळावरून माल निर्यात होणार आहे त्या विमानतळावरील ‘सीमाशुल्क विभागाकडे’, ‘शिपिंग बिलाची’ नोंदणी करावी लागते.

कृती २ : ‘शिपिंग बिल’ तयार झाल्यानंतर ज्या ‘एअर लाईन’ मध्ये माल चढावावयाचा आहे, त्या ‘एअर लाईन’ कडून ‘कारटिंग ऑर्डर’ आणि ‘एअर वे बिल’ घ्यावे लागतात.

कृती ३ : ‘शिपिंग बिल’, ‘एअर वे बिल’ आणि ‘कारटिंग ऑर्डर’ ‘एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया’ च्या ‘निर्यात विभागात’ प्रस्तुत करून ‘AAI शुल्क’ भरावे लागते.

कृती ४ : निर्यात माल आता विमानतळावर आणता येतो. सोबत वर नमूद केलेल्या सर्व दस्तऐवजांची प्रत पाठवणे आवश्यक असते. दस्तऐवज तपासून माल आत घेतला जातो. AAI ने ठरवून दिलेल्या जागेवर माल उतरवून मालाची पावती AAI कडून घेतली जाते.

कृती ५ : ‘सीमाशुल्क विभागाचे’ परीक्षक येऊन मालाची तपासणी करतात. माल व सोबतचे दस्तऐवज योग्य असल्यास सीमाशुल्क विभाग मालाला ‘Let Export’ परवानगी दिली जाते.

कृती ६ : ‘Let Export’ व इतर दस्तऐवज AAI विभागाला तसेच ‘शिपिंग लाईन’ला सुपूर्द केले जातात. ‘शिपिंग लाईन’ आता माल विमानात चढवू शकते.

५.५ आंतरराष्ट्रीय वाहतूक - समुद्री मार्ग

मागच्या भागात ‘आंतरराष्ट्रीय वाहतुकीचे’ प्रकार कोणते आणि त्यांची योग्य निवड कोणत्या निकषाने करावी याबाबतचे विवेचन समजावून घेतले. या भागात आपण ‘समुद्री वाहतुकी’बाबत माहिती घेऊ.

‘समुद्री वाहतूक’ हा निर्यात मालाच्या वाहतुकीचा एक महत्त्वाचा पर्याय आहे. ‘हवाई वाहतुकीच्या’ मानाने ‘समुद्री वाहतुकीचा’ खर्च खूपच कमी असल्याने सर्वसाधारण माल ‘सुमुद्री मार्गानेच’ निर्यात होतो. आंतरराष्ट्रीय व्यापारात अंदाजे ७०% मूल्याच्या मालाची वाहतूक ‘समुद्री मार्गाने’ होते. परंतु, मालाच्या वजनाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय मालाच्या ८०% हुन जास्त वजनाचा माल ‘समुद्री वाहतुकीने’ होतो. मागील भागात नमूद केलेल्या निकषांवरून आपल्या मालाला ‘समुद्री वाहतूक’ योग्य आहे अथवा नाही याचीही चाचणी सर्वप्रथम करणे आवश्यक आहे.

‘समुद्री वाहतुकीचे’ फायदे

निर्यातीत, ‘समुद्री वाहतुकीचे’ अनेक फायदे आहेत व त्यामुळेच ‘समुद्री वाहतूक’ सर्वात जास्त लोकप्रिय आहे. ‘समुद्री वाहतुकीचे’ प्रमुख फायदे खालील प्रमाणे आहेत:

●      ‘समुद्री वाहतूक’ इतर पर्यायांच्या मानाने अतिशय स्वस्त असते

●      अवजड वस्तू, तसेच मोठ्या शिपमेंट सहज हाताळता येतात

●      लहान शिपमेंटसाठी देखील एकत्रीकरण करता येणे शक्य असल्याने ‘समुद्री मार्ग’ योग्य ठरतो

●      ‘घातक वस्तू’ हाताळता येतात

●      तापमान व वातावरण नियंत्रण आवश्यक असलेल्या वस्तू सहज हाताळता येतात

●      मालाची सुखरूपता राखली जाते

‘समुद्री वाहतुकीचे’ प्रकार

‘समुद्री मार्गाने’ माल वाहतूक करण्याचे अनेक प्रकार आहेत. ‘समुद्री वाहतुकीचे’ प्रमुख प्रकार पुढील प्रमाणे आहेत: ( १ ) बल्क कॅरियर, ( २ ) टँकर कॅरियर, ( ३ ) कार्गो कॅरियर आणि ( ४ ) कंटेनर कॅरियर

●      ‘बल्क कॅरियर’ : सागरी वाहतुकीच्या ४३% माल ‘बल्क कॅरियर’ यातून केला जातो. ‘बल्क कॅरियर’ प्रकारात निर्यात माल सुटा लादला जातो. खनिजे, कोळसा, लाकूड, सिमेंट, स्टील, साखर, धान्य, रासायनिक पदार्थ, इ. प्रकारातील मालाची वाहतूक  ‘बल्क कॅरियर’ प्रकाराने केली जाते.

●      ‘टँकर कॅरियर’ : सागरी वाहतुकीच्या ३९% मालाची वाहतूक ‘टँकर कॅरियर’ प्रकाराने केली जाते. तेल, रसायने, रासायनिक वायू इत्यादी मालाची वाहतूक या प्रकाराने होते.

●      ‘कार्गो कॅरियर’ : सर्वसाधारण वाणिज्य मालाची ने-आण ‘कार्गो कॅरियर’ या प्रकारातून होते. यंत्रसामग्री, स्टील फॅब्रिकेशन, मोठ्या आकाराचे बॉक्स, इ. माल ‘कार्गो कॅरियर’ या प्रकारातून होतो. सागरी वाहतुकीच्या ४% माल ‘कार्गो कॅरियर’ यामधून होतो.

●      ‘कंटेनर कॅरियर’ : सर्वसाधारणपणे वाणिज्य मालाची ने-आण ‘कंटेनर कॅरियर’ या प्रकारातून होते. परंतु ‘कंटेनर कॅरियर’ प्रकारात माल पूर्वनिर्धारित आकाराच्या कंटेनरमध्ये लादून हे कंटेनर जहाजावर लादले जातात. यामुळे, लहान आकाराचे बॉक्स व वस्तू यांची सहजपणे वाहतूक तर करता येतेच, परंतु जहाजात बऱ्याच जास्त प्रमाणात माल लादता येतो. सागरी वाहतुकीच्या १३% माल ‘कंटेनर कॅरियर’ यामधून होतो.

कंटेनर कॅरियर

शेती माल, शेती प्रक्रिया माल, खाद्य पदार्थ व इतर उपजीविकेच्या वस्तूंची निर्यात बहुतांशी ‘कंटेनर कॅरियर’ या प्रकारातूनच होते. सद्य कोर्स अशा प्रकारच्या मालाच्या निर्यातीस केंद्रित केलेला असल्याने, ‘कंटेनर कॅरियर’ मधून होणाऱ्या निर्यातीबाबत अधिक माहिती घेणे आवश्यक आहे. पुढील भागात याबद्दल सविस्तर विवेचन मांडले आहे.

‘कंटेनर कॅरियर’ मधून माल निर्यात करण्यासाठी अनेक प्रकारचे कंटेनर मिळतात. आपल्या मालाच्या प्रकारावरून योग्य कंटेनर निवडणे आवश्यक असते. बॉक्सची संख्या, वजन, आकारमान, मालाचा प्रकार, बॉक्सचा प्रकार, मालास तापमान व वातावरण नियंत्रणाची आवश्यकता आहे का, इत्यादी गोष्टींचा अभ्यास करून योग्य तो कंटेनर निवडावा लागतो. यासाठी कंटेनरच्या प्रकारची माहिती असणे आवश्यक आहे. काही महत्त्वाच्या प्रचलित कंटेनरची माहिती पुढे दिली आहे.

कंटेनर हे सहसा स्टील किंवा ऍल्युमिनिअम पासून तयार केलेले डबे असतात. पत्र्याना ताकद यावी यासाठी त्यांचे कॉरोगेशन केलेले असते. कंटेनरच्या तळाशी प्लायवुडचा थर दिलेला असतो. कंटेनरच्या सर्व बाजू हवाबंद केलेल्या असतात. कंटेनर मध्ये लादलेला माल नीट बांधण्यासाठी खालील भागात हूकची व्यवस्था असते. ‘सर्वसाधारण कंटेनरना’ बाजूने दरवाज्याची व्यवस्था केलेली असते. दरवाज्याला कडी व सील करण्याची व्यवस्था असते.

‘सर्वसाधारण कंटेनर’ ( General Purpose Container, GP ) : ‘GP कंटेनर’ चे वेगवेगळे प्रकार आणि त्यांचे आकारमान खाली मांडलेल्या तक्त्याप्रमाणे असते. दिलेले आकडे सांकेतिक असून प्रत्येक ‘शिपिंग लाईनच्या’ कंटेनर मध्ये थोडा फार फरक आढळतो.

TABLE

 

‘रिफर कंटेनर’ ( Reefer Container ) : फळे, भाजीपाला, खाद्यपदार्थ, मांस, औषधे, इत्यादी मालाची वाहतूक करताना तापमान नियंत्रित करणे आवश्यक असते. यासाठी ‘रिफर कंटेनर’ चा वापर केला जातो. घरातल्या फ्रिजप्रमाणे या कंटेनर मध्ये तापमान नियंत्रित केले जाते. कंटेनरच्या आत थंड हवा सारखी खेळत राहील याची व्यवस्था केलेली असते. ‘रिफर कंटेनर’ मध्ये तापमान -३० C ते +३० C यामध्ये राखता येते. मालाच्या प्रकाराप्रमाणे तापमान ठरवले जाते. तापमान नियंत्रित करण्यासाठी कंटेनरला वीज पुरवठा करणे आवश्यक असते. ‘GP कंटेनर’ प्रमाणेच, ‘रिफर कंटेनर’, २० ft आणि ४० ft या दोन प्रकारात येतात. कंटेनरचे आकारमान व वजन लादण्याची क्षमता थोड्या फार फरकाने ‘GP कंटेनर’ प्रमाणेच असते.

‘विशेष कंटेनर’ ( Special Purpose Container ) : निर्यात मालात अनेक वेळा विशिष्ठ प्रकारचा माल किंवा अवजड मालाची ने-आण करणे आवश्यक असते. बऱ्याचदा असे बॉक्स ‘GP कंटेनर’ मध्ये बसत नाहीत. किंवा ‘GP कंटेनर’ मध्ये माल लादणे शक्य होत नाही. अशावेळी ‘विशेष कंटेनरचा’ ’ उपयोग केला जातो. परंतु अशा कंटेनर ची उपलब्धता मर्यादित असते. ‘शिपिंग लाइनकडे’ सहसा उपलब्ध असलेले काही प्रकार खालीलप्रमाणे आहेत:

●      ओपन टॉप कंटेनर

●      हार्ड टॉप कंटेनर

●      फ्लॅट रॅक कंटेनर

●      टॅंक कंटेनर

●      डबल डोर कंटेनर

●      साइड डोर कंटेनर

‘सुटा माल’ ( Less Container Load, LCL ) : बऱ्याच वेळा निर्यात माल संपूर्ण कंटेनर भरण्या एवढा नसतो. अशावेळी संपूर्ण कंटेनर घेणे निर्यातदाराला महाग पडते. या प्रकारचा सुटा माल निर्यात करण्यासाठी ‘Less Container Load’ म्हणजेच LCL प्रकाराने माल वाहतूक करण्याची सुरुवात झाली. शिपिंग व्यवसायात ‘शिपमेंट समूहक’ ( Consolidator ) असतात. हे ‘समूहक’, छोट्या निर्यातदारांकडून बंदरावर माल एकत्र करतात. माल कोणत्या ‘आयती बंदरात’ पाठवायचा आहे त्या प्रमाणे वेगळा केला जातो. हा माल एकत्रितपणे २० ft किंवा ४० ft कंटेनर मध्ये लादला जातो. माल ‘आयाती बंदरात’ पोहोचल्यानंतर पुन्हा वेगळा केला जातो व संबंधित ग्राहकांकडे सुपूर्द केला जातो.

‘फ्रेट फॉर्वर्डर’ ची नेमणूक :

सर्वप्रथम योग्य ‘फ्रेट फॉर्वर्डर’ ची नेमणूक करणे रास्त असते. फ्रेट फॉर्वर्डरचे महत्त्व काय असते याचा सविस्तर अभ्यास आपण ‘हवाई वाहतुकीत’ केला आहे. ‘हवाई वाहतुकीप्रमाणेच’, ‘समुद्री वाहतुकीत’, ‘फ्रेट फॉर्वर्डर’ ची नेमणूक महत्वाची ठरते.

खर्चाच्या अंदाजाची मागणी ( Request for Quotation, RFQ ) :

‘फ्रेट फॉर्वर्डर’ कडून खर्चाच्या अंदाजाची मागणी ( RFQ ) कशी करावी याबद्दलचे विवेचन आपण ‘हवाई वाहतुकीत’ पहिले आहे. ‘समुद्री वाहतुकीतही’ असे RFQ आवश्यक असते. ‘समुद्री वाहतुकीत’ खर्चाचा अंदाज घेण्यासाठी पुढील माहिती ‘फ्रेट फॉर्वर्डरला’ देणे आवश्यक असते :

●      बॉक्सेसची संख्या

●      प्रत्येक बॉक्सचे वजन, लांबी, रुंदी व उंची

●      माल कोठून उचलावयाचा आहे

●      माल कोणत्या बंदरातून निर्यात करावयाचा आहे

●      माल कोणत्या देशात व कोणत्या बंदरात पोहोचवायचा आहे

●      माल पुढे ग्राहकांपर्यंत पोहोचावयाचा असेल तर तो पत्ता

●      माल ‘घातक वस्तू’ ( dangerous goods ) मध्ये मोडतो का?

●      मालाला तापमान नियंत्रणाची आवश्यकता आहे का?

●      मालाचा HSN कोड काय आहे?

●      खर्चात कोणत्या सेवांचा अंतर्भाव असावा?

खर्चाचा अंदाज ( Quotation )

वरील माहिती ‘फ्रेट फॉर्वर्डरला’ दिल्यानंतर ‘फ्रेट फॉर्वर्डर’ खर्चाचा अंदाज देतो. अंदाजाच्या खालील अटी ‘फ्रेट फॉर्वर्डर’ नमूद करतो :

●      बॉक्सची संख्या, शिपमेंटचे वजन व आकारमान

●      कोणत्या प्रकारचे व किती कंटेनर लागतील याचा अंदाज

●      माल लादण्याचे व उतरवण्याचे बंदर

●      जहाज येण्याचे व जाण्याचे वेळापत्रक

●      माल बंदरावर पोहोचवायची अंतिम तारीख

●      ‘सीमाशुल्क मंजुरीस’ लागणारा वेळ

●      ‘शिपिंग लाईन’ कडे माल सुपूर्द करावयाची अंतिम तारीख

खर्चाचा अंदाज खालील प्रमाणे दिला जातो :

●      ‘समुद्री वाहतुकीचा’ खर्च ( Ocean Freight ), USD / ctr

●      ‘टर्मिनल हाताळणी’ खर्च (Terminal Handling Charges, THC)

●      ‘सीमाशुल्क मंजुरी’ खर्च ( Custom Clearance Charges)

●      प्रलेखन खर्च ( Documentation Charges )

माल निर्यातीसाठी संपूर्ण कंटेनर लागणार असेल तर ‘समुद्री वाहतुकीचा’ खर्च, ‘प्रति कंटेनर’ मध्ये ( USD / CTR ) दिला जातो. जर माल कमी असेल व LCL प्रकाराने पाठवला जात असेल तर ‘समुद्री वाहतूक’ खर्च, ‘प्रति फ्रेट टन’ ( USD / FRT ) असा दिला जातो. शिपमेंटचे वजन किंवा आकारमान यापैकी जे जास्त असते त्याला ‘फ्रेट टन’ असे संबोधले जाते.

समुद्री वाहतूक प्रणाली

‘समुद्री वाहतुकीसाठी’ माल जहाजावर चढवण्याचा प्रामुख्याने पुढील दोन प्रक्रिया आहेत.

●  स्वतःच्या फॅक्टरी किंवा गोदामात माल कंटेनरमध्ये भरणे

●  बंदरावर माल कंटेनरमध्ये भरणे

स्वतःच्या फॅक्टरीत किंवा गोदामात भरून कंटेनर शिपिंग लाईनकडे सुपूर्द करण्याची परवानगी ‘सीमाशुल्क विभागाने’ निर्यातदारांना दिली आहे. परंतु, यासाठी सर्वप्रथम ‘सीमाशुल्क विभागाकडून’, ‘factory stuffing’ परवानगी घेणे आवश्यक आहे. ‘Factory stuffing’ परवानगी नसल्यास माल बंदरावर आणून तेथे कंटेनरमध्ये लादला जातो. माल LCL प्रकाराने पाठवायचा असेल तरीदेखील माल बंदरावरच कंटेनरमध्ये भरला जातो. समुद्री वाहतूक प्रणाली खालीलप्रमाणे असते :

●  Factory stuffing परवानगी मिळवणे

●  रिकामा कंटेनर बंदरावरून वाहतूक करून आपल्या फॅक्टरी / गोदामावर आणणे

●  ‘निर्यात माल’ योग्य पद्धतीने कंटेनरमध्ये भरणे ( Stuffing )

●  वाहतुकीदरम्यान माल जागचा हलू नये, यासाठी बंधपट्ट्याने बांधावा ( Lashing )

●  कंटेनर बंद करून त्याला ‘सीमाशुल्क विभागाचे’ सील लावावे

●  ‘शिपिंग लाईन’ कडून ‘काऱाटिंग ऑर्डर’ आणावी

●  भरलेला कंटेनर ‘शिपिंग लाईनच्या’, CFS ( Container Freight Station ) वर आणावा

●  ‘सीमाशुल्क विभागाकडे’, ‘शिपिंग बिल’ व इतर दस्तऐवज द्यावेत

●  ‘सीमाशुल्क विभागाकडून’, ‘निर्यात मंजुरी’ मिळवावी ( Let Export Order )

●  ‘निर्यात मंजुरी पत्र’, ‘शिपिंग लाईन’ कडे सुपूर्द करावेत

●  ‘शिपिंग लाईन’, माल जहाजात चढवण्याची व्यवस्था करेल

५.६ इन्कोटर्म्स ( INCOTERMS )

आंतरराष्ट्रीय व्यवहारात ‘इन्कोटर्म्स’ यांना अतिशय महत्व आहे. विक्रेता व ग्राहक यांनी खरेदी-विक्री करताना घातलेल्या अटींचा दोघांनाही सामान अर्थबोध व्हावा या उद्देशाने ‘इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने, इन्कोटर्म्स यांची निर्मिती केली आहे. आंतरराष्ट्रीय व्यवहारात लागणाऱ्या कृती करण्याची कोणाची जबाबदारी असेल, त्याचा खर्च कोणी केला पाहिजे व वास्तूच्या मालकी हक्काचे हस्तांतरण कधी होईल याचे स्पष्टीकरण देऊन ‘इन्कोटर्म्स संज्ञा’ तयार केल्या आहेत. ‘इन्कोटर्म संज्ञा’ कोणत्या आहेत व त्यांचा अर्थ काय आहे याचे सविस्तर विवेचन या भागात केले आहे. सर्व ‘इन्कोटर्म्स संज्ञा’ खाली दिल्याप्रमाणे आहेत. परंतु सद्य कोर्सला आवश्यक अशा काही निवडक संज्ञांचेच विवेचन पुढील भागात केले आहे.

EXW → FCA → FAS → FOB → CPT → CFR → CIF → CIP → DPU → DAP → DDP

EXW

‘EXW’ प्रकारच्या विक्रीमध्ये विक्रेता वस्तू आपल्या फॅक्टरी, गोदाम अथवा ठरलेल्या जागी माल उपलब्ध करून देतो. यापुढची सर्व कारवाई करण्याची जबाबदारी खरेदीदाराची असते. निर्याती देशात सीमाशुल्क विभागाची मंजुरी घेण्यासाठी निर्यातदाराकडून बऱ्याच दस्तावेजाची आवश्यकता असते. तसेच निर्यातदाराला निर्यात केल्याचा दाखला मिळवणे आवश्यक असते. यामुळे निर्यात व्यवसायात EXW प्रकारची विक्री, विक्रेता व खरेदीदार यांना सोईस्कर होत नाही. EXW प्रकारच्या व्यवहारात विक्रेता आणि खरेदीदार यांच्या जबाबदाऱ्या खालील प्रमाणे असतात :

TABLE


FCA

‘FCA’ प्रकारच्या विक्रीमध्ये विक्रेता बंदरापर्यंत वाहतूक करणे व ‘सीमाशुल्क विभागाकडून’, ‘निर्यात मंजुरी’ मिळवण्यापर्यंत जबाबदार असतो. त्यापुढची सर्व जबाबदारी खरेदीदाराची असते. याप्रकारची विक्री निर्यातदार व खरेदीदार दोघांनाही सोईस्कर असल्याने आधुनिक आंतरराष्ट्रीय व्यापारात FCA प्रकारची विक्री लोकप्रिय झाली आहे. FCA प्रकारच्या व्यवहारात विक्रेता आणि खरेदीदार यांच्या जबाबदाऱ्या खालील प्रमाणे असतात :

TABLE


FOB

जेव्हा FCA प्रकारामध्ये नमूद केलेल्या जबाबदारीशिवाय बंदरावर माल उतरवणे व जहाजावर माल चढवणे हे देखील विक्रेता करतो तेव्हातो व्यवहार ‘FOB’ प्रकारात मोडतो. FOB याप्रकारची विक्री अतिशय लोकप्रिय आहे. परंतु आधुनिक व्यवसायात FOB ऐवजी FCA विक्री करण्याचा प्रघात वाढत आहे. FOB प्रकारच्या व्यवहारात विक्रेता आणि खरेदीदार यांच्या जबाबदाऱ्या खालील प्रमाणे असतात:

TABLE


माल खरेदीदाराच्या फॅक्टरीमध्ये उतरवणे

CFR

CFR या प्रकारच्या विक्रीमध्ये माल ‘आयात बंदरापर्यंत’ पोहोचवण्याची जबाबदारी विक्रेत्याची असते. CFR प्रकारची विक्री देखील आंतरराष्ट्रीय व्यवहारात लोकप्रिय आहे. CFR प्रकारच्या व्यवहारात विक्रेता आणि खरेदीदार यांच्या जबाबदाऱ्या खालील प्रमाणे असतात :

TABLE


CIF

CFR प्रमाणेच CIF या प्रकारात विक्रीसाठीचा माल ‘आयात बंदरात’ पोहोचवण्याची जबाबदारी विक्रेत्याची असते. याही पुढे, विक्रेता मालाचा वाहतूक विमा देखील उतरवतो. CIF प्रकारच्या व्यवहारात विक्रेता आणि खरेदीदार यांच्या जबाबदाऱ्या खालील प्रमाणे असतात :

 

TABLE


 

मालाचा विमा करणे

 

DDP

DPU, DAP याप्रकारच्या विक्री प्रकारात विक्रेत्याला ‘आयाती देशातील’ हाताळणी करणे देखील अपेक्षित असते. फक्त ‘आयाती देशातील’, ‘सीमाशुल्क नोंदणी’ विक्रेता करतो. याही पुढे जाऊन खरेदीदाराच्या हातात माल पोहोचवण्याची संपूर्ण जबाबदारी विक्रेता DDP याप्रकारच्या विक्रीत घेतो. ‘सीमाशुल्क नोंदणी’ व आयाती देशातील ‘आयाती कर’ भरण्याची जबाबदारी देखील विक्रेत्याची असते. यात खरेदीदार फक्त आलेला माल आपल्या फॅक्टरीत उतरवून घेण्याचे काम करतो. DDP प्रकारच्या व्यवहारात विक्रेता आणि खरेदीदार यांच्या जबाबदाऱ्या खालील प्रमाणे असतात :

TABLE